Ashutosh Potdar

प्रमोद मुनघाटे
भूमिगत सीतेची आर्त साद
“एकटेपणाचे भूत ही आजच्या सर्वव्यापी दहशतवादाप्रमाणेच एक मोठी समस्या आहे. या एकटेपणाला ‘आधुनिकता’ संबोधणारी उत्तरआधुनिकताही आता जुनी होईल अशा उत्क्रांत अवस्थेत आपण आहोत. एका दु:स्वप्ननाप्रमाणे आपल्याला हे सगळे वेढून आहे. आशुतोष पोतदार यांची कविता काळ-अवकाश यांच्या मर्यादा ओलांडून जाणाऱ्या आकृत्यांप्रमाणे आहे. एखाद्या मांडणीशिल्पासारखा अनुभव ही कविता देते. या मांडणीत प्राचीन-भूतकाळातील गोष्टी जशा सहज येतात तशा कवीच्या कौटुंबिक गतकालीन भावविश्वातील अडगळ, इच्छा-वासना आणि आधिभौतिक विश्वातील अनुभवही येतात. आभासी विश्वही आता दुभंगले आहे. एक आपल्या मनाच्या तळाशी असलेले नेणिवेच्या पातळीवरील विश्व आणि दुसरे सायबरविश्वातील आभासी विश्व. हे सगळे त्रिमितीत आशुतोषच्या कवितेत भेटतात. ”
**
“पोतेरे लावून भिंत सारवून खरखरलेल्या हाताने चुलीतला निखारा कॉटवरले बेडशीट नीट करावे एखाद्या फुलवाईने राखेपासून बाजूला करायचीस”
खेळ खेळत राहतो उंबरा या आशुतोष पोतदार यांच्या संग्रहातील ‘मामी आजी : दोन’ या कवितेच्या सुरवातीच्या या ओळी.
अलीकडे रोजच नव-नवे संग्रह हाती येत असतात. पण एक दोन कविता वाचल्यानंतर कवीच्या मनोविश्वात आपण झपाटल्यासारखे ओढले जाऊन दिवसभरात वेळ मिळेल तेंव्हा पुन्हा पुन्हा वाचत रहावा असे संग्रह फारच थोडे असतात. आशुतोष पोतदार यांचा ‘खेळ खेळत राहतो उंबरा’ हा असाच संग्रह अलीकडे हाती आला. आशुतोषची एकदा कोल्हापूरला भेट झालेली. पण फार काही वाचलं नव्हतं कधी. त्यांच्या नाटकांविषयी माहिती आहे इतकेच; आणि ‘हाकारा’ चा ई-अंक ते नियमितपणे पाठवीत असतात.
या कवीच्या एकाच स्तरावरील अनुभवाच्या, अधिकाधिक घट्ट होत जाणाऱ्या अभिव्यक्तीत आपणही संपृक्त होत जातो. वर्तमानात जगताना काही असह्य ताण आपला भवताल विकृत करत जातात. हा ताण हलका करण्यासाठी कवी जाणीवपूर्वक भूतकाळात जात नाही. तर मेंदूत जणू आदिम काळापासून वसत असलेली भूतेच त्याच्या अनुभवाचा ताबा घेतात. अशा प्रकारचे एक निरीक्षण आशुतोष पोतदार यांच्या कवितेविषयी प्रारंभीच नोंदविता येईल.
‘मामी आजी’ सारख्या कवितात केवळ स्मरणरंजन नाही. चमकदार प्रतिमांचा खेळ तर नाहीच. एका समग्र पिढीच्या जगण्यातील मूल्यव्यवस्थांची अनुभूती हा कवी अशा कवितातून घेत आहे, असे वाटते. रक्ताचे नाते, आतड्याची ओढ ह्यातून आलेला हा दुःखाचा पीळ नाही. तर जगण्याच्या स्वाभाविकतेतून जन्मलेल्या शहाणपणाची जाणीव आहे. पोतेरे, सारवणे, रखरखले हात, निखारा आणि राख अशा निव्वळ शब्दातून परंपरेतील स्त्रीजीवनाकडे पाहाणाऱ्या कवीचे हळवे मन या कवितांमधून व्यक्त होते. म्हणून व्यक्तिगत आठवणींच्या पलीकडे कवितेतील अनुभव सार्वत्रिक होतो.
‘मामी आजी : दोन’ या कवितेच्या अखेरच्या ओळीही अनुभवाचे एक आवर्त पूर्ण करणाऱ्या आहेत:
“तुझ्या परतवंडांच्या
वहिवरला स्पायडरमन
आता जाळं पसरतोयउडी मारायसाठी सज्जय
आपले नेट टाकून
त्याच्या नेटचा हरेक नासेचा धागा
पाताळात खुंटीवर लटकवलेल्या
गात्रांच्या मोगरमायेत शिरून
चंद्रावर विसावणाऱ्या
तुझ्या खरखरीत हाताकडे झेपावतोय
अनुभवाच्या तळाचा थांग घेताना कवी जाणीव-नेणिवेत रुतून बसलेली काही दृश्ये, शब्द, रंग, संवेदना आणि गोठून गेलेले काही क्षण कवितेत उधळत असतो. तेंव्हा कुठे शब्दांचे कवडसे उजळून काढतात अनुभवाचे अंधारे कोनाडे. अशा कोनाड्यातील काही आठवणी, काही दुखऱ्या जागा आणि अनामिक वेदना कवितेचा भाग बनतात. उदा. ‘ढेकूण रात्री’
‘काल रात्री :
सुसाट आवाजाने चुकून धावलेले वाहन
मधूनच सूर चुकून केकाटणारे कुत्रे
उशी लावलेल्या भिंतीतून ऐकू येणारे संभोगाचे उसासे
लघवी केल्यावर सोडलेल्या फ्लशचा आवाज
यातल्या कशानेच जाग नाही आली
पण, पाठीशी वळवळणाऱ्या हालचालीने
( खरंतर अशा हालचाली अंगभर दिवसभर होत असतात
उदाहरणार्थ , लघवीच्या जागी ऐन मिटींगमधे काहीतरी होते
कलीगला काही वाटेल का?
अशा चोरट्या, धास्तावलेल्या नजरेने
आपण नकळत ‘ अॅडजस्ट ‘ करतो आपला अवयव)
पण आता तसं काहीच नव्हतं
तीन-चार ढेकणं
रोमान्स करत होती
भांडण करत होती
गप्पा मारत होती
शांत बसली होती
सेक्स करत होती
एक तपकिरी काळपट
एक जीव नसलेलं
एक कसतरी चालणारं
किरकिरीचिडचिडी
कुबट
विस्कटलेली
खाजवणारी
या कवितेची अखेर अशी आहे:
ओडोमॉसला सरावलेल्या
माझ्या टॅन्ड कातडीला
आजकाल
काही सोसवत नाही
थोडे गार पाणी नाही
अन् थोडे गरम पाणीही नको वाटते
एक लुकडं."
भावनांचे लकाकते धारदार पाते प्रत्येकच कवीच्या काळजात लाटांसारखे उसळत असते. पण या लाटाही अदृश्य असतात. त्यांना दृश्यरूप देताना कवीला काही वक्ती, वस्तू, स्थळ, स्वप्नं, व्यक्ती सापडतात. यातील काही काल्पनिक असतात, काही क्षणिक दृश्यभासही असतात. ‘ढेकुण रात्री’ हे असेच एक दृश्य आहे. कवीला “ओडोमॉसला सरावलेल्या/ माझ्या टॅन्ड कातडीला/ आजकाल/ काही सोसवत नाही” असे वाटते. या दीर्घ कवितेत कवीला सात वर्षापूर्वीची आणि दहा वर्षापूर्वीचीही रात्र आठवते. त्या आठवणीत जुना चौसोपी वाडा आहे. त्या दृश्यात मरणाला टेकलेली म्हातारी आहे, गाईगुरं आहेत आणि तिथे ढेकणांना अपरिहार्य स्थान आहे.
“कुणी नाही आलं
तिचा पदर सावरायला
सरणावर पदर ठेवेपर्यंत मात्र
माजघरातील भिंती
अखंड काळ्या ठिपक्यांनी भरून गेल्या
आयुष्यभर तिच्या बरोबरच्या ढेकणांनी
मातम केला तिच्यासाठी”
आता ओडोमॉसला सरावलेल्या कवीच्या वर्तमानकाळात आता कशालाच स्थान नाही. अतिसंवेदनशिलतेचा हा अनुभव असावा.
या कवीच्या कवितेत वाडा, माजघर या प्रमाणे ‘उंबरा’ शब्द वारंवार येतो, तो एक संपूर्ण संकल्पना म्हणून. या एका शब्दातून मोठ्या सांस्कृतिक अवकाशाचा बोध होतो. आत-आणि बाहेर यांना सांधणारा उंबरा. सगळ्या मनाच्या आतील एक खासगीपण आणि घराच्या आतील एक खासगीपण जपणारा उंबरठा आता कुठे आहे? तथाकथित संपन्न जीवनशैलीचे उदात्तीकरण किंवा सांस्कृतिक कवच नष्ट झाल्याची हळहळ इथे आहे का? जगण्याची समग्रता नष्ट होत असल्याची ही जाणीव आहे. या जाणिवेत दृश्य-अदृश्य आणि सजीव निर्जीव या साऱ्याच गोष्टी येतात.
“या शहरातल्या घराच्या उंबऱ्यावरून
पडलेले स्लीपर आणि शूज
पाहत बसतात एकटक
या शहरातल्या घराच्या उंबऱ्यावरून
म्हणायला उंबरा
पण, बाकी वेळेस
एक लाकडी अडथळा
बाहेरचे पाणी आत येऊ नये म्हणून बसवलेला
किंवा
दार बाहेर जाऊ नये म्हणून ठोकलेला
कधीतरी दिसायचे
माझ्या चपलांना आणि स्लिपरींना
रस्त्यावरचे चेहरे
त्यांच्या नजरा
उत्सुक डोळे
टवकारलेले कान”
बाहेरचे आत नाही आणि आतील बाहेर नाही अशी अतिसंवेदनशिलता (की संवेदनशून्यता) मनुष्याने आजवरच्या प्रवासात कष्टाने मिळविली आहे. या प्रवासाचा त्याला अभिमान वाटतो का? की तो बळी आहे या प्रवासाचा, हाही कवीच्या संभ्रमावस्थेचा अनुभव आहे. या संदर्भात ‘आरसे’ ही संपूर्ण कविताच इथे उद्धृत करण्याचा मला मोह होतो:
कोपऱ्या कोपऱ्यावर
पडलेयत आरसे
विनासायास मिळतात
क्रेडीट कार्डावर
एका फोनच्या रिंगसरशी
सतर्क करू शकता स्वत : ला
वेगवेगळ्या कोनातून
निरखू शकता
सहजासहजी न दिसणाऱ्या
शरीरातल्या छुप्या रुस्तमना
आरशांना बिलगलेयत
वेगवेगळ्या बँकांचे लोगो
लोड उतरवलाय त्यांनी
तुमच्या आर.सी. बुकवर
कुणा- कुणाचे चेहरे
कोरलेयेत त्या आरशावर
बँड अँबॅसिडर
म्हणून त्यांचेच चेहरे दिसतात
आरशांवर
आपण मोजतो
आपल्या नाकाची लांबी
तुलना करत राहतोः
त्यांच्याबरोबर, त्यांच्या नाकाबरोबर
मापून पाहतो
त्यांच्या गालांचे सफरचंदीपण
आणि त्यांच्या आयब्रोजची लांबी
मागून-पुढून पाहत राहतो
आरशामध्ये विखुरलेल्या
आपल्या मुखड्याला
तपासतो
जोडून बघतो
घालून बघतो
उरसात घेतलेले कानातले डूल
विद्या बालनच्या
मापाची खात्री करून घेतो
हजारदा दहा हजारदा
मान फिरवून फिरवून
स्पॉन्डिलीटीस होईल म्हणून
लाखदा दहा लाखदा
चाचपडून पाहतो
आपल्याच पायातले चप्पल.
आजच्या जगण्याची असंख्य प्रतिबिंब दाखवणारी ही कविता आहे. क्रेडीट कार्ड, बँका, ब्रांड अंबासीडर आणि सौंदर्याचा अतिरेकी सौंदर्याचा हव्यास, हे सगळे आपल्याला अशा एका वेगवान प्रवासात लपेटून घेतले आहे की आपले आता काहीच नियंत्रण उरलेले नाही त्या वेगावर. हा वेगवान प्रवास जगभरच्याच नागरिकांचा एकाच वेळी सुरु असला तरी प्रत्येकजण एकटा आहे. हे एकटेपणही जणू आपण कष्टाने साध्य केलेल्या क्रांतीतून मिळवले आहे का? हाही संभ्रमावस्थेचा अनुभव आहे. ‘एकटेपणा’ या कवितेत हा कवी म्हणतो,
“एकटेपणाची भुतं
अंगभर विखुरलीयत
शोधून काढून
कानातल्या औषधाच्या
रबरी बुचाप्रमाणे
उचकटून टाकावीत
चिमटीत धरून उचकटून टाकावे
मेलेल्या उंदरासारखे
पण
स्वयंप्रेरित भुतं
पुनरुत्पादित होत राहतात
मास्टरबेशनमधूनच
कुणी देवो न देवो त्यांची अंडी सतत
उबत राहतात…”
एकटेपणाचे भूत हे आजच्या सर्वव्यापी दहशतवादाप्रमाणेच एक मोठी समस्या आहे. या एकटेपणाला ‘आधुनिकता’ संबोधणारी उत्तरआधुनिकताही आता जुनी होईल अशा उत्क्रांत अवस्थेत आपण आहोत. एका दु:स्वप्नाप्रमाणे आपल्याला हे सगळे वेढून आहे. आशुतोष पोतदार यांची कविता काळ-अवकाश यांच्या मर्यादा ओलांडून जाणाऱ्या आकृत्यांप्रमाणे आहेत. एखाद्या मांडणीशिल्पासारखा अनुभव ते वाचकांना देतात. या मांडणीत प्राचीन-भूतकाळातील गोष्टी जशा सहज येतात. कवीच्या कौटुंबिक गतकालीन भावविश्वातील अडगळ, इच्छा-वासना आणि आधिभौतिक विश्वातील अनुभवही या मांडणीत येतात. आभासी विश्वही आता दुभंगले आहे. एक आपल्या मनाच्या तळाशी असलेले नेणिवेच्या पातळीवरील विश्व, दुसरे सायबरविश्वातील आभासी वास्तव. हे सगळे त्रिमितीत आशुतोषच्या कवितेत भेटतात.
या संग्रहात आवाजी कविता नाही. तसेच भाषिक चमत्कृती नाही. आधुनिकतेच्या पलीकडे जाणवणाऱ्या भावना-संवेदनांना एका आकृतीत किंवा मांडणीशिल्पात बसवणारा हा कलावंत कवी आहे. त्याच्या अभिव्यक्तीतील अनुभव ज्ञानात्मक किंवा बोधात्मक नाही. काहीसा कॅथर्सिसच्या पातळीवरचा आहे. मूल्य आणि निष्ठा अशा अशा संबोधांचे स्वतंत्र परिमाणही असण्याची गरज वाटत नसलेली ही निर्मिती आतूनच एकात्म आहे. या कवीच्या व्यक्त होण्याचे प्रयोजन सौंदर्य किंवा निर्मितीचा ध्यास असेही वेगळे सांगता येत नाही इतकी असोशी आणि सहजता या कवितेत आहे. म्हणून ‘माय कर्ली बॉय’ या कवितेत तो म्हणतो,
“तू लिहितोस अक्षरे तेंव्हा
समुद्रमंथनाची चाहूल लागते
तू पुसतोस अक्षरे तेंव्हा
भूमिगत सीता रामायण रिवाईंड करते.”
‘भूमिगत सीता’ हे आशुतोष यांच्या एकूण अभिव्यक्तीचे मुख्य सूत्र म्हणून सांगता येईल असे वाटते.
**
(Archived on January 01, 2024.)