वाटले होते काही मैल
- Ashutosh Potdar
- Mar 14, 2024
- 6 min read
Updated: Mar 15, 2024

वाटले होते काही मैल हे हिमांशू भूषण स्मार्त लिखित दोन अंकी नाटक आहे.
“खून करायची इच्छा असणाऱ्याच्या” नजरेतून लिहिलेले वाटले होते काही मैल या नाटकाची कथा सुजय, अरुणा आणि माणूस या तीन व्यक्तिरेखांभोवती गुंफलेली आहे. सुजय हा साधारण ३०-३५ वर्षांचा आणि त्याच्याच म्हणण्यानुसार तो ‘साधा, नॉर्मल, विवाहित, सर्वसामान्य माणूस’ आहे. तर अरुणा ही २०-२२ वर्षांची मानवी शरीरातील पेशींचा अभ्यास करणारी हुशार कॉलेजकन्या. सुजयला कोणाचातरी खून करून बघायची इच्छा आहे. या इच्छेचा अर्थ लावण्यासाठी त्याने अरुणाला पकडून आणले आहे. पण तो तिचा खून करेलच याची खात्री त्याला नाही. खून करण्यापेक्षा आपल्याला खून का करावासा वाटतो या प्रश्नाचे उत्तर शोधणे सुजयसाठी अधिक महत्त्वाचे आहे. आपली ओळख करून देत सुजय सांगतो: “ मी सिरीयल किलर नाही. मला तुमच्यावर बलात्कार करायचा नाही, मी मनोविकृत नाहीये. मी अतिशय सामान्य माणूस आहे. A very normal and healthy…(अचानक थांबतो) individual म्हणावं कीं human being यात confusion झालयं. पण the thing is की मी नॉर्मल आहे. (हसतो.)...मला नीट अर्थ लागला पाहिजे खून करण्याच्या इच्छेचा!”
अरुणाला या कशाचीच कल्पना नाही आणि सुजयवर विश्वास ठेवावा की नाही अशा संभ्रमात असल्याने ती भयभीत झाली आहे. पहिला अंक संपताना माणूस या व्यक्तिरेखेची चाहूल लागते. तेव्हा दारावर झालेली टकटक इतका वेळ त्या बंदिस्त जागेत असणाऱ्या दोन व्यक्तींखेरीज कोणीतरी तिसरेदेखील ह्या नाट्यात सहभागी होणार असल्याची वार्ता देणारी असल्याने अंकाची समाप्ती एका उत्कंठावर्धक बिंदूवर होते. दुसऱ्या अंकाची सुरुवात होताना आधी निर्माण झालेले विशिष्ट तणावपूर्ण वातावरण बदलते आणि एका नवीन व्यक्तिरेखेचा प्रवेश होतो. ‘माणूस’ या व्यक्तिरेखेचा तिथे येण्याचा हेतू आणि तिचा ह्या नाटयातील सहभाग यांभोवती आपले विचारचक्र फिरू लागते. हा माणूस सुजय आणि अरुणाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. एखाद्या दूरदर्शन वाहिनीच्या रियालिटी शो सारख्या कार्यक्रमाचा सूत्रधार असावा तशी या माणसाची व्यक्तिरेखा आहे. ‘माणसा’चे हे नाट्य आल्याने नाटकाला नेमक्या ठिकाणी आवश्यक कलाटणी मिळते.
एका बंदिस्त जागेत एकमेकांशी बोलता-बोलता दोघे एकमेकांत काही खेळ खेळत असता सुजय जन्म- कष्ट- समृद्धी- प्रगती- माज- युद्ध- नाश या चक्राच्या वास्तवाने आलेली निराशा मांडतो. तर अरुणा मानवी पेशींच्या तिच्या अभ्यासातून तिचे याबाबतीतले तात्त्विक विचार मांडते आणि काही ठिकाणी तिला स्व-अस्तित्वावर प्रश्नही पडतात. दुसऱ्या अंकात एका अनोळखी माणसाचा प्रवेश होतो तेव्हा आतापर्यंत सुजयच्या विरोधात असलेली अरुणा या नवीन अज्ञाताच्या भीतीने त्याचाच आधार घेते आणि ते दोघेही आता नवीन माणसाच्या विरोधात एकत्र येतात. पुढे त्या माणसाचा या घटनेतील सहभाग लक्षात आल्यावर ती संभ्रमात पडते आणि तिघेही एकमेकांच्या विरोधात जातात. यामध्ये सुजय आणि अरुणा यांना आपण इतरांकडून खेळवले जात असल्याची भावना मूळ धरू लागते.
वाटले होते काही मैल या नाटकातील काही संवाद विशेष दाद देण्याजोगे आहेत.
उदाहरणार्थ:
“हिमालयात राहून घामोळं झाल्यासारखी स्थिती आहे आपली”.
“मिशीच्या केसांसारखी हळूहळू इतकी gadgets आली की चेहरा ओळखेना स्वतःचा”.
“नव्या माणसांच्या ओळखी होण्याचे मार्ग इतके टिपिकल झालेत आता”.
“माणूस नष्ट झाल्यावर त्याचं काय काय नष्ट होतं? मला सगळ्या वस्तू एकट्या पडलेल्या बघायचंय, माणसाशिवाय”.
“तुमच्यावर लक्ष आहे सतत”.
“प्रत्येक दिवस मागण्या करत उगवतो”.
“तुम्ही जागे होतच नाही. तुमचा switch on होतो”.
“या अख्ख्या जगात खरंखुरं काही चाललेलंच नाही. खरंतर काही चाललेलंच नाही”.
तर अरुणाचे सुरुवातीचे भय ओसरल्यावर सुजयची तिला आलेली चीड “पोट भरलेली माणसं मारायला जास्त मजा येते का?” अशा संवादांतून बाहेर पडते.
“कुठल्या ताकदीच्या जोरावर एवढं जग मी तयार केलं आणि कसा मालक झालो सगळ्याचा ती ताकद मला तपासू द्या की माझी. माझी ताकद माझ्या छातीवर बसते, घुसमटायला होतं. मला नव्हतं हे करायचं” या सुजयच्या संवादावर, “हे तुमचं illusion आहे. तुमच्या नसलेल्या ताकदीचं भूत करून तुम्ही माझं भविष्य मारलंत. तुमच्या या इच्छेसाठी तुम्ही जिला खूप गोष्टी करायच्या आहेत, मोठं होऊन शोध लावायचे आहेत अशा निष्पाप मुलीची कोंडी केलीत. तसाही माझा खून झालाच आहे.” या अरुणाच्या संवादांतून नाटककार सुचवतो की सत्ताधारी मूठभर लोक ताकदीच्या जोरावर कमी ताकदवान लोकांची आयुष्ये नियंत्रित अथवा नष्ट करतात. शिवाय काही बाह्य घटक माणसाच्या आंतरिक प्रेरणा दाबून टाकतात, त्यांत बदल करतात अथवा नष्ट करतात. या दोघांच्या आयुष्याचा खेळ करत असलेली माणूस ही व्यक्तिरेखा हा खेळ अधिकाधिक रंजक व्हावा यासाठी स्वतःची भावनिक गुंतवणूक करत नाही. तर तो तटस्थपणे त्यांना सूचना देतो, उदाहरणार्थ, “तुम्हाला एसएमएस जास्त येण्यासाठी पब्लिक अपील नीट करा”, “तुमची चकमक चांगली रंगली तर दिवाळीला हा एपिसोड लावता येईल”, “माझ्याकडे तुम्हाला motivate करण्यासाठी ट्रिक्स आहेत. तुम्हाला ज्या ज्या वेळी जे जे करावेसे वाटेल त्यासाठी मी तुम्हाला energy देईन. दोघांचीही energy वाढेल.”
नाटकातील अशा संवादांतून व्यक्तिरेखाही उभ्या राहातात.
एकमेकांशी होणाऱ्या संवादातून माणसाच्या जन्मापासून तो मरेपर्यंत कोणकोणत्या गोष्टींनी त्याच्या आयुष्यावर परिणाम होत जातो? निरनिराळी माणसे, वस्तू, संपर्कसाधने, भांडवलशाही, हे सगळे आपली विचारप्रक्रिया आणि निर्णयक्षमता नियंत्रित करत असतात. हा विचार पुढे नेत कथेत येणारी वळणे आपण, म्हणजे सर्व माणसे कोणाकडून तरी खेळवले जात आहोत का असा अस्तित्ववादी प्रश्न उपस्थित करतात. सुजयला कोणाचातरी खून करून बघण्याची प्रामाणिक आंतरिक इच्छा आहे आणि तो त्या इच्छेचा पाठपुरावा करू इच्छितो. पण बाह्य जगातील प्रसारमाध्यमे, कौटुंबिक आणि सामाजिक बंधने त्याच्या या प्रयत्नांच्या आड येत आहेत. त्याला दोघांच्याही कुटुंबियांकडून आणि पोलिसांकडून येणारा व्यत्यय नको आहे. त्याहूनही माणूस ही व्यक्तिरेखा त्याच्या या इच्छेचे भांडवल करून घेत एका रियालिटी शो सारख्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याच्या हिशोबाने स्वतःच्या सूचनेनुसार दोघांना वागायला लावत आहे. आपल्या कोणत्याही कृती खाजगी नाहीत. त्याहूनही, त्या आपल्या नियंत्रणात नाहीत. संपूर्ण जग आपल्यावर कायम नजर ठेवून आहे. या जागतिकारणाच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि हा भाग वाटले होते काही मैल या नाटकात आपली भूमिका अदा करताना दिसतो कारण याचे कळत नकळत दडपण सुजय आणि अरुणा या दोघांवर आलेले आपल्याला दिसते. त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना व्यक्त होता येत नाही. मोबाइल, मेल, गूगल अर्थ अशा उपकरणांची उदाहरणे घेत बाहेरील जगाशी संपर्काची साधने वाढली असल्याचा तसेच या साधनांनी आपला वैयक्तिक अवकाश व्यापून आपल्या विचारप्रक्रियेत ढवळाढवळ केल्याचा निर्देश नाटकात केलेला आहे. यामागे गेल्या २०-३० वर्षात जागतिकीकरणाने जे काही बदल झाले त्यांचा मानवी जीवनावर पडलेला प्रभाव नाटककाराला सुचवायचा असेल असे वाटते. सध्याच्या काळात सुळसुळाट झालेले स्मार्टफोन्स नाटकात येत नाहीत. इंटरनेट, ईमेल, मोबाईल, संगणक यांचा उल्लेख आहे म्हणजे साधारण २००० च्या आसपासचा काळ आणि तेव्हाचा सुशिक्षित मध्यमवर्गीय मध्यमवयीन सुजय, महत्त्वाकांक्षी मुलींचे प्रश्न मांडणारी मध्यमवर्गीय अरुणा आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या कनिष्ठ तसेच मध्यमवर्गाला दूरदर्शनच्या माध्यमातून भुरळ घालणाऱ्या मालिका आणि नवीनच आलेले रियालिटी शोज या जागतिकीकरणातील आयकॉनिक प्रक्रियेचे चित्रण नाटकात येते. एवढं सगळं नावीन्य येऊनही बोअरडम जात नाही हे विशेष:
सुजय: नव्या माणसांच्या ओळखी होण्याचे मार्ग इतके टिपिकल झालेत ना सध्या! Nothing New - माणसांचे चेहरे नवे फक्त, कनेक्शन तेच उद्योग तेच, नाती पाळण्याचे नियम तेच सगळ्यांसाठी. Loss of variety.
वाटले होते काही मैल हे नाटक ज्या पुस्तकात समाविष्ट केले आहे त्या पुस्तकासाठी निवडलेले मुखपृष्ठ मानवी मनातील कोलाहल आणि मुक्ततेकडे जाण्याची आस दर्शवतात. पुस्तकातील इतर संहितांप्रमाणे (ट्रिपल सीट आणि मौन) या नाटकाची संहिताही त्याच विचाराला थोड्या वेगळ्या प्रकारे प्रस्तुत करते. एकमेकांशी संवाद होत असताना सुटसुटीत छोटी वाक्ये आणि सातारा परिसरातील प्रादेशिक शब्द असलेली बोलीभाषा वाटले होते काही मैल मध्ये दिसते, उदाहरणार्थ- इल्यूजनाय, सवयाय यांसारखे शब्द. दोन व्यक्तिरेखांमधील चर्चा वैयक्तिक पातळीवर जातानाचे संवाद काहीसे वैचारिक असल्याने स्वगते येतात आणि साहित्यिक भाषा अधिक वापरलेली दिसते. काही ठिकाणी मोठी अलंकारिक वाक्ये आणि शाब्दिक खेळ केले आहेत.
सर्व सुखसोयी आणि तंत्रज्ञान जोडीला असूनही आधुनिक जगातील माणसांचा एकटेपणा आणि वैचारिक स्वातंत्र्यात आलेल्या मर्यादा हा पेच वाटले होते काही मैल मध्ये चांगला उभा केला आहे. माणसे आपापल्या जगात एकटी आहेत हे तथ्य प्रस्थापित झाल्यावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही बाबी बोलण्यातून समोर येतात. त्यातून त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजते. त्यानंतर आलेल्या प्रसंगांतील संवाद मात्र कथेला किंवा या पेचाला पुढे नेत नाहीत. वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून त्यावर दोघांची मते (सुजय आणि अरुणा) मांडली जातात. मात्र त्यांचा कथेशी फारसा संबंध नसल्याने काही काळ वाटले होते काही मैल ची संहिता भरकटल्यासारखी वाटते. खुनाच्या प्रयत्नाचा वातावरणात निर्माण झालेला ताण हलका करण्यासाठी काही संवाद चांगले योजले आहेत मात्र ते लांबल्याने कथेतील सलगता हरवते आणि परत काही कारणाने सुजय अरुणाचा खून करण्याचा नवीन प्रयत्न करतो तेव्हा मूळ कथेचा धागा परत पकडला जातो. शेवटी त्यांच्या या जीवन मरणाच्या खेळात खऱ्या आणि आभासी माध्यमातून पूर्ण जगाला सहभागी करून अखेर काय साधले? सुजयला त्याच्या खून करून पाहण्याच्या इच्छेचा अर्थ लागला का? स्पर्धा जिंकल्याच्या जल्लोषात सुजयची मूळची ध्येयपूर्ती झाली की नाही हे त्याचे जाणून घ्यायचे राहिले असे काही प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात.
हिमांशू भूषण स्मार्त यांनी लिहिलेल्या वाटले होते काही मैल (२०१७) या नाटकासाठी संशोधन आणि लेखन अमृता जोशी यांनी केले आहे आहे.
संशोधनासाठी अजून काही नोंदी, मुद्दे आणि प्रश्न:
जागतिकीकरणाने आणि मध्यमवर्गीय एकसुरी जीवनात काही बदल आणला काय?
“प्रत्येक दिवस मागण्या करत उगवतो. बोंबलत तुम्ही त्या पुऱ्या करता… तुम्ही जागे होतच नाही. तुमचा स्विच ऑन होतो.”
नाटकाचे संविधानक आकारण्यात तंत्रज्ञानाचा कोणता सहभाग असू शकतो? पहिला अंक संपताना पुढील वर्णन येते:
“सुजय तिच्यापाशी येतो. तिच्या मस्तकाला पिस्तूल लावतो. छाप ओढणार एवढ्यात laptop ची beep वाजते. पुन्हा वाजते. मोबाइलला इनकमिंग कॉलनी रिंग वाजते, वाजत राहते. सुजय थोडासा चलबिचल…”
तंत्रज्ञान नाटकीय अवकाशाचा भाग असल्याचे उदाहरण म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. इथे अंक बदलतो. तंत्रज्ञानाची क्लुप्ती वापरात मानवी संवेदन आणि नाटकाच्या रचनेत बदल अशा तीन बाबी सहज होताना दिसतात.
अशी अजून कोणती उदाहरणे देता येतील: या नाटकातील आणि इतर नाटकातील?
सुजय आणि अरुणाला अस्तित्वाचे कोणते प्रश्न/पेच पडले आहेत याचे त्यांना आकलन झाले आहे काय? म्हणूनच की काय नाटकाचा फॉर्म इंटरेस्टिंग असून ते ड्रॅग होते?
सुजय: (निरुत्तर) सारखं सारखं मला टीज नको करुस. माझा मार्ग चुकलाय माहितीय मला, पण आता इलाज नाही. (विराम) उद्या लग्न होऊन आई झालीस कि एक माणूस वाढवशीलच की तू! त्याची उत्सुकता नाहीये का तुला?
(काय म्हणायचे आहे इथे. confused ?
नाटक middle-class trap मध्ये? - लग्न/मूल वाढवणे?
जागतिकीकरण:
Computer + Gadgets
Human Life + Technology
Characterisation = technology ?
नाटक बाहेरचे जग कसे उभे करते? : TV वरील कार्यक्रम? (११६)
Consumerism + capitalist (119)
दोन व्यक्तिरेखांत ताण निर्माण करण्याची क्लुप्ती: आजारपण (BP) असल्याचे दाखवणे?- नव्या जगातील ताण?
Comments