top of page

Untitled

  • Sep 21, 2016
  • 4 min read

Updated: Oct 12, 2023



माझ्या अंगणी गं माझ्या अंगणी पाचोळा गं पडे

विद्यार्थ्यांशी संवाद म्हणजे संस्कृती-दर्शनाची बाब. विद्यार्थी कधी विद्यापीठात शिकणारे असतात तर कधी कॉलेजात. वेगवेगळ्या बॅकग्राऊंडसमधून येणा-या तरुण मुलां-मुलींशी शहर आणि गावपातळीवर संवाद होत असतो. बरच काही शिकण्यासारखं आणि समजून घेण्य़ासारखं. दरवेळचा अनुभव काहीतरी नवं देऊन जाणारा. संवाद सुरु होताना: “तुम्ही कुठून आला आहात” अशा काहीशा प्रश्नाने सुरुवात होते. मग, ‘बुलढाणा’, ‘जालना’ नाहीतर ‘कोल्हापूर’ अशी गावं कानावर पडतात. तर कधी, चेन्नई, बेंगलुरू किंवा इम्फ़ाळ अशीही नावं. अलिकडेच अमेरिकेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांबरोबर ‘संस्कृती’ या विषयाबद्दल चर्चा करण्याचा वर्ग झाला. मलाही विचारतात तेंव्हा, कसबा सांगाव, कोल्हापूर, लोणी काळभोर, मिरज, कणकवली, बेंगलोर, पुणे अशी गावं. गावांबरोबर येतात वेगवेगळ्या भाषांचे आवाज, लहेजे. प्रवासाचे वेगवेगळे मार्ग. वागण्या-बोलण्याच्या त-हा. आर्थिक-सामाजिक संदर्भ. आणखी बरच काही.

अमेरिकेतले विद्यार्थी म्हणल्यावर ग्लोबलायझेशन, श्रीमंती इत्यादि-इत्यादि (गैर)समज. तिथेही छोट्या-छोट्या गावातून येऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी असतात. आर्थिकदृष्ट्या कमकूवत गटातले, सामाजिक स्तरावर परिघांवर फ़ेकले गेलेले. अलिकडे भेटलेल्या अमेरिकेतुन आलेल्या मुला-मुलींनी भारतात येण्याआधी भारताचा अभ्यास केला होता. आम्ही भारतीय शिक्षणाबद्दल बोलू लागलो तर फ़ुले, गांधी आणि आगरकरांचा विषय निघाला. विशेषकरुन, एकोणिसाव्या शतकात भारतात-विशेषतः महाराष्ट्रात या थोरामोठ्यांनी केलेल्या पायाभूत कार्याबद्दल काही मुलांना असलेले भान अचंबित करणारे होते. त्यांचे वय १८-२० मधे कुठेतरी. अर्थात, कोल्हापूर वा बुलढाण्याजवळच्या गावातुन येऊन पुण्यात शिक्षण घेणारी मुले जितक्या तळमळीने भारतीय शिक्षण चळवळींबद्दल बोलतील तेवढी तळमळ अमेरिकेतुन येणा-या विद्यार्थ्यांकडून आपण अपेक्षित करु शकणार नाही. कारण, त्यांचे अनुभव वेगळे आणि सामाजिक आणि राजकिय भाग वेगळ्या संदर्भातले.

एकदा माझ्या वर्गात अमेरिकेतल्या एका विद्यापीठात शिकविणा-या प्रोफ़ेसर बाई बसल्या होत्या. तिथे त्या अभिनय शिकवणा-या. त्या दिवशी आमच्या वर्गात भारतातील वेगवेगळ्या भाषांमधल्या नाटकांची चर्चा सुरू होती. तेंडूलकर, इंग्रजी भाषेत नाटक करणार-या महेश दत्तानींपासून ते मणिपूरात विधी परंपरांना मुलभूत मानून नाटकाचा खेळ मांडणा-या कन्हायलालांपर्यंत विविध संदर्भात आमची चर्चा सुरू होती. सुरुवातीलाच आम्ही मान्य केले होते की होते की विविध भाषांमधील नाटक वा साहित्याला ’प्रादेशिक’ म्हणून भौगोलिकतेत बांधून सीमीत करता येणार नाही. शिवाय असही ठरलं होतं की भाषेतलं नाटक म्हणून इथल्या लोकपरंपरांचं गौरवीकरणही करत गळाही काढायचा नाही. नाही तर, ‘संस्कृती-अभ्यासा’तून नीट काही हाताला लागणार नाही.

त्या दिवशी वर्गात काहीतरी खासच घडत होतं. आम्ही सगळे एन्जॉय करत होतो. वर्गातले सगळे हिरीहिरीने आपली मते मांडत होते. काही गोरी, काही काळी, काही मुले, काही मुली, काही गरीब आणि काही श्रीमंत. काहींचे आई-वडील विभक्त आणि घरचे ताण-तणाव. काहींसाठी एकत्र कुटूंब आणि जीवाला जीवाला जीव देणारा गोतावळा.

प्रत्येकाच्या भाषेतला आवाज, आकार, लहेजा एकमेकांपर्यंत पोहचत होता.

का कुणास ठाऊक, कधी-कधी एक गाणं माझ्या मनात सारखं-सारखं येत राहातं. गाडी चालवताना, सायकल चालवताना. कुठंतरी प्रवास करताना. शांत बसलेलो असताना. ते गाणं ड्रामॅटिक आहे. संवादी वाटत आलय. भवतालचं भान तीव्र करणारं कालातीत असलेलं हे गाणं. लहानपणी: शाळेत, गावात, रेडिओवर, एखाद्या सभेत हे गाणं ऐकल्याच्या पुसट आठवणी जाग्या होतात. अभ्यासाच्या पुस्तकातून सारखं-सारखं हे गाणं बाहेर येत राहातं. ‘संस्कृती’ विषयीच्या जमून आलेल्या चर्चेत हे गाणं का येऊ नये, मी विचार करत होतो. भीती होती की मला गाता येत नाही आणि हे तर गाणं गायचं आहे. वाचायचं नाही. काही का होईना म्हणून चर्चा थांबल्याच्या क्षणाचा फ़ायदा घेऊन मी या गाण्य़ाला म्हणून दाखवायला सुरुवात केली:

“बाई मी धरण धरण बांधिते..माझं मरण मरण कांडीले/ झुंजू मुंजू गं झालं, पीट जात्यात आटलं, कणी कोंडा ग कोंडा मी रांधीते॥“ मग पुढे, “माझ्या अंगणी गं माझ्या अंगणी पाचोळा गं पडे.”

मराठी जाणणा-या मुलांनी बोर्डवर इंग्रजी लिपीत गाणं लिहिलं.

मी वाचून गेलो. मराठीतील हे अक्षरलेणी मी वाचतो तेंव्हा मला आत काहीतरी होतं, दरवेळी. क्षणभरानंतर, लक्षात आलं की कितीवर्षे आपण हे गाणं गुणगुणतोय़. पण, दरवेळी या गाण्यातलं नवं काहीतरी बाहेर येतं. आजुबाजूला बसलेली पोरं माझ्याकडं बघत बसली होती. वर्गात जागा असेल आणि व्यवस्था करता येत असेल तर आम्ही गोलाकार बसणे पसंद करतो. आज तसेच बसलो होतो. वाचून झाल्यावर सांगितलं दया पवारनी हे गाणं लिहिलंय. त्यांच्याबद्दल थोडीशी माहीती देऊन झाल्यावर आमच्या लक्षात आलं की यातली शब्दं सगळ्यांना समजली नाहीत. अर्थ तर लांबचाच. पण, तरीही काही जण डोलत होते, पायाला ठेका धरत होते. कविता आकलन करुन घ्यायला अभंग, जात्यावरच्या ओव्या, स्त्री-गीते इत्यादी चर्चा अपरिहार्य. कवीता-गाणी गेयता आणि नाट्यमयता आणते कशी आणि त्याच्या नाटकीय शक्यता कशा असतात याबद्दल आम्ही बोलत होतो.

परंपरेचे गुणगान करत आपण शरीरातली लय विसरत चाललोय. मणिपूरचा माझा मित्र, मंगांगसाना मैतेई. तो पेना हे मणिपूरी वाद्य वाजवतो. एकदा त्याच्या बरोबर बोलत होतो ते आठवले. मणिपूरच्या डोंगरद-यात तो कामासाठी त्यावेळी फ़िरायचा. तो तावातावात बोलत होता. आदिवासी समाजातल्या लोकांबरोबर फ़ोटो काढून घेतात. त्यांच्या पोराबाळांना ओटी-पोटी घेऊन फ़ोटो काढुन घेऊन फ़ेसबूकवर ठेऊन लोकपरंपरांचा अभ्यास करतोय हे दाखवणारे बरेच असतात. पण, परंपरेतल्या आतल्या गेयतेचे काय? मी गप्प बसलेला पाहून तो पुढे सांगू लागला. तुम्ही लोक नाटक-नाटक म्हणता ते काय वेगळं असतं? मी चालता चालता नाचतो, नाचत नाचत गातो आणि पेना वाजवतो. परंपरेतुन आपल्या साहित्याचा शोध घ्यायला पाह्यजे म्हणून व्यासपीठावरुन गळे काढणा-या प्राध्यापकी थाटाची भाषणे माझ्या मनात येऊन जातात.

आम्ही “बाई मी धरण-धरण” गुणगूणत होतो तेवढ्यात मंगांग मनात येऊन गेला. वाटलं, या गाण्य़ावर मंगांग किंवा आसामाचा शुक्राचार्य राभा किती छान ठेका धरतील.

आमच्या चर्चेचा मुद्दा हाच होता. गाणं, नाचणं आणि नाटक कसं वेगळं असू शकत नाही.

“बाई मी धरण धरण” मधल्या नाट्यमय प्रतिमांबद्दल मी सांगायचा प्रयत्न करत होतो. भाषिक संदर्भांपलिकडे जाऊन त्या कलाकृतीची ओळख करुन देताना मजा येते. कस लागतो. खरंतर, संस्कृतीचं भाषांतर करणं एक आव्हानच. मराठी, इंग्रजी वा हिंदी मधल्या आपापल्या मर्यादा सांभाळून आपण त्या लांघण्याचा प्रयत्न करतो आणि संवाद साधतो. परफ़ॉर्मन्स पोएट्री हा फ़ॉर्म आपल्याकडे तसा विकसित झाला नाही. किंबहूना, कविता काय गाण्यासाठी असते? असा प्रश्न विचारून आत्ममग्नता हे कवितेचे व्यवच्छेदक लक्षण मानण्यात आधुनिकतावाद्यांनी धन्यता मानली. आणि भारतीय कुटूंबव्यवस्थेमधे सभोवतालच्या कोलाहलात आपला आवाज शोधणारी आत्ममगता फ़क्त पारंपरिक मानून त्यासाठी वेगळी परिमाणे लावली गेली. त्यामुळे, आज कविता वाचन म्हणजे कवीचा फ़क्त आवाजच ऐकू येईल अशा त-हेने केले जाते. किंवा, छोट्या जागी, चार दोन लोक अत्यंत गंभीर चेहरे करुन, जगाचे सामाजिक-राजकीय ओझे आपल्या डोळ्यांवर घेऊन कविता वाचत असतात.

माझ्या वर्गात हॉटेलमधल्या छोट्या बारमधे गिटार वाजवत गाणी म्हणणारा एक विद्यार्थी होता. आमची सगळ्यांची काही-बाही चर्चा सुरु होती तोवर ‘बाई मी धरण’ वर त्याने गिटारीच्या तारा छेडायला सूरुवात केल्या. आम्ही त्याकडे कान देऊन ऐकत होतो. इंग्रजी लिपीत लिहुन घेतलेली कविता तो अडखळत गात होता.

“माझ्या घामाचे गं आडे … माझ्या अंगणी गं माझ्या अंगणी पाचोळा गं पडे…” ही ओळ वाचताना माझ्या आत काय होतं हे सांगायला ब-याच वेळा शब्द आठवत नाही. आता आठवलं: गलबलतं.

नाटकाच्या अभ्यासाठी अंगण ही संकल्पना भारतीय नाट्यपरंपरेचे वेगवेगळे आयाम मांडायला मदत करते. समाज, कुटूब व्यवस्था, घर आणि समाजातलं नातं, पब्लिक स्पेस इथंपासून ते बादलसरकारांच्या अंगणमंचपर्यंत अंगण आम्हाला आणतं. दया पवारांच्या या गाण्य़ाबरोबर, अंगणात समाज आणि वेदनेचा काला आम्ही मांडला. देश-कल्पनांच्या सीमा लांघून बाईचं असणं आणि भोगणं, माणसाचं राबणं आणि रापणं अंगणाच्या नाटकात येतं तेंव्हा ते संस्कृतीचं नाटक होतं. या अंगणात मणिपूरच्या समाजावर सदोदित मिलिटरी अंकूश ठेवणा-या राजसत्तेला आव्हान देणारी इरोम शर्मिला असते. तसच, तिच्या कितेक वर्षांच्या उपवासाकडे बथ्थडपणे पाहाणारी राजसत्ता आणि समाजसत्ताही असते. ‘बाई मी धरण-धरण’ ने आमच्या वर्गात संस्कृतीसंदर्भातले कितीतरी प्रश्न मांडले. प्रश्न घेऊन खेळत गेलो की अंगणातलं नाटक विस्तारत जातं आणि राष्ट्र आणि भाषेच्या पलिकडं जाण्याची स्वप्नं बघायला लागतं.

Comments


bottom of page