top of page

कीर्तन मंथन

आज आपल्यासमोर मी मला कीर्तन कसे दिसते हे माझ्यातल्या लेखकाच्या, नाटककाराच्या आणि अभ्यासकाच्या भूमिकेतून मांडणार आहे. मी नाट्य आणि रंगभूमी- अभ्यास या ज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. या अभ्यास शाखेमध्ये नाटक आणि तत्सम प्रयोग कला/सादरीकरणाच्या कलांचा विविध इतर ज्ञान शाखांच्या अनोन्य संबंधातून केला जातो. नाटककार म्हणून लिहिण्याच्या प्रक्रियेत मी शब्दांबरोबर  दृष्यात्म रूपात जगाची आणि माझ्या विषयाची मी कल्पना करत असतो. कीर्तन एक दृश्य रूप उभे करते ते मला भावते आणि आकर्षित करते. त्याबरोबरच, कीर्तनाची पुनर्भेट त्याच्या सर्वांगातून नसली तरी वेगवेगळ्या घटकांतून नाटककार आणि दिग्दर्शक वेळोवेळी घेत आलेले आहेत.  त्याचा विचार करणे मला महत्वाचे वाटत आले आहे. कीर्तनाविषयी आपल्यासारख्या कलाकार आणि विद्वत्जनांसमोर बोलण्याचे अजून एक कारण म्हणजे माझे कुटुंब आणि आमचा कौटुंबिक इतिहास- आमचे कुटुंब कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा सांगाव या गावचे. माझ्या घरी माझ्या आजोबांनी पुढे नेलेली वारकरी भजन परंपरा होती. आमचा स्वतःचा भजनाचा ग्रुप होताच शिवाय फक्त भजनाचे घर होते जे आठवड्यातील गुरुवाराबरोबर महाशिवरात्र,एकादशी आणि इतर वेगवेगळ्या सण वारांना भजने करत. शिवाय, गावातल्या इतर भजन मंडळींबरोबर च्या नेटवर्कमधून पंचक्रोशीतील वेगवेगळ्या भजनाच्या कार्यक्रमांना आमचे सामान घेऊन आम्ही जात असू. 

कीर्तन म्हटले की त्याची मूळे विधी परंपरेत, विधीतून येणाऱ्या वैश्विकतेत आणि मौखिकतेत असतात. विधी, वैश्विकता आणि मौखिकता ही कीर्तनाची ओळख आणि त्याचे ते व्यक्तिमत्व असते.

कीर्तनाचे प्रयोग रूपाची वैशिष्टये पुढील प्रमाणे सांगता येतील:

कीर्तनाची संहिता – लिखित या अर्थाने नव्हे तर सादरीकरण या अर्थाने. कीर्तन हाच शब्द पद्य, पद्यमयता सुचवतो. कीर्तनातील मांडणी काव्यमय असते. ती भारतीय जीवन आणि परंपरेत नांगर मारून असते.

इथल्या परंपरेत कथन आणि काव्य हे विरोधार्थी येत नाहीत. काव्य म्हणजे कविता असे जाणार असू तर सुसान ट्रिप हे अभ्यासक म्हणतात त्याप्रमाणे, “Kavya is a kind of supergenre not exactly equivalent to any term in English.” काव्यामध्ये ऐतिहासिक, उपदेशपर साहित्य येते तसेच नाटक, महाकाव्य, लिरिक, मग ते गद्य किंवा पद्य असू शकते. त्याच्या मांडण्याच्या पद्धतीवरून काव्य दृश्य असेल श्राव्य असेल किंवा मिश्र – आख्यान कथा कीर्तन वैगेरे रूपे आपल्या समोर येतील.


मौखिक परंपरांविषयी बोलले जाते. पण असे करताना, ते काही विशिष्ट शाखांपुरते पुरते मर्यादित राहते. नाट्य संगीत संप्रेषण वैगेरे. त्यापलीकडे अभ्यास साधने विकसित केली जात नाहीत. मुळात मौखिक आणि लिखित असे द्वंद्वात्मक पाहायला हवे का याचा विचार व्हायला हवा. एक तर खरंच फक्त मौखिकतेतील उस्फुर्त का संहितानिष्ठ उस्फूर्तता आहे. म्हणजे जी वेगवेगळी कीर्तने आजकाल येऊ पाहतायत त्याआधारे आपण बोलू शकतो. विधिवत परंपरांमधून कीर्तन आले असा एक विचार प्रवाह असला तरी त्यातल्या विधीसाठी कीर्तन ओळखले जाणार नाही तर त्यातल्या प्रयोगशील अविष्करणासाठी आणि कलात्म अभिव्यक्तीसाठी. त्यातील कार्यकारण भावापेक्षा त्यातील सौंदर्यतत्वासाठी- आता हे सौंदर्यातत्व सर्वांसाठी वेगवेगळे असू शकते. विधीमध्ये नाटकीय शक्यता- जर्म असेल पण विधी म्हणजे नाटक नाही. पण विधी ची वेगवेगळी रूपे नाटक वापरते.

कीर्तन- कथने लिहिणारा आणि वाचणारा अशा दोन तुकड्यांमध्ये विभागलेली नसतात. तर कीर्तनकार आणि श्रोता अशा रचनासूत्रात असते. जे काही कीर्तन सादर होते ते त्या दोहोंमधला प्रबंध असतो असे म्हणता येईल. अशोक दा रानडे लिहितात त्याप्रमाणे: कीर्तनकार आणि त्याचे श्रोते व प्रेक्षक एका माळेचे मणी असतात. याशिवाय, महत्वाचे म्हणजे ते फक्त फिज़िकल अवकाशात एकत्र नसतात तर, परत एकदा रानडेंच्या भाषेत: “एका सुसंबद्ध विचार प्रणालीने विधिपरंपरेने बद्ध असलेल्या दीक्षा गृहीतांच्या समुदायाचा तो (कीर्तनकार) एक अधिक मुखर पाईक असतो.”

इथे, कीर्तनाला एकल प्रयोग म्हणणार की सामूहिक प्रयोग? तर दोहोंची सांगड घालणारा अशी ती – रानडे खूप छान शब्द प्रयोग करतात – “सामूहिक साधना” असते. वारकरी पंथ प्रयोगकर्ता यांचा परस्परभाव गृहीत धरता येईल. आम्हाला जे नाटकीय द्वंद्व शिकविले जाते ते कमी असते किंवा नसतेच. चांगल्या आणि वाईटाच्या संघर्षातून कीर्तनातील ‘नाट्य’ उपजत नाही. किंबहुना ‘संघर्ष’ हा काही इथल्या नाट्यमयतेचा आधार नसतो. इथे धक्का तंत्र नसते. खरं तर मांडलेला विषय आपल्याला माहिती असतो. कीर्तनाचा प्रयोग बघण्याआधी आपल्याला त्यातील गोष्ट माहिती असते. कुणी विचारात नाही काय गोष्ट सादर करणार आहे. कारण मुख्यत्वे ती गोष्टीरूप प्रबंध मांडणी असते. कीर्तनकार आपापले गोष्टीरूप मांडतो. म्हणजे, हे गोष्टीरूप आपल्याला माहिती असणाऱ्या ‘गोष्टीची गोष्ट’ असते. म्हणजे, रचनेच्या रूपात बोलायचे तर जो दिसतो त्या प्रयोगाला ‘आधीची गोष्ट’ असते जी कीर्तनाच्या त्या परंपरेत मान्य असते, रूढ असू शकते. कीर्तनकार आपली गोष्ट मांडतो. रचना सूत्र पाहायचे तर ते असे होईल- गोष्टींपुर्वीची गोष्ट – गोष्ट – वास्तविक दिसणारी/सांगितलेली गोष्ट. ही वास्तविक दिसणारी गोष्ट वेगवेगळी असू शकते. अशा वेगवेगळ्या गोष्टीद्वारे- गोष्ट मांडण्याद्वारे – गोष्टीच्या रुपाद्वारे आपण त्या त्या कीर्तनकाराला ओळखतो. इथे वेगवेगळी तंत्रे, पद्धती आलेल्या आपल्याला दिसतात. पारंपरिक भारतीय तसेच एकोणिसाव्या शतकानंतर वेगवेगळ्या वैचारिक तसेच प्रयोग संकल्पनाचा स्वीकार तंत्राद्वारे कीर्तन परंपरेत झालेला दिसतो. शिवाय, इतर नाट्य-सादरीकरण यांच्याशी असलेले नाते.

आता मी या रचना सूत्रात अधिक खोलात जाऊन डोकावण्याचा प्रयत्न करतो.


तर काळजीपूर्वक पाहिले तर आपल्या लक्षात येईल कि अनुकरणाची आणि रूप धारण करण्याची वेगवेगळी अंगं कीर्तन उभी करत असते. रानड्यांच्या मते श्रोते- प्रेक्षकांचा सहभाग इतका असतो की त्याला ते सामूहिक साधना म्हणतात. अशा प्रयोगाचा एकच एक निर्माता कसा मानता येईल? आणि तो तसा आहे असे क्षणभर गृहीत धरले तर ते अनुकरणातून आकारलेले नाट्य कसे होईल?

ज्या प्रयोगात सामूहिक साधना असते त्याला अनुकरणशील नाट्य कसे म्हणता येईल?

किंबहुना अनुकरण करणे या संकल्पनेची मर्यादा जाणवावी इतपत कीर्तनात अनुकरण नसते. कारण, ते रूप धारण करणे असते. आपण जाणता की रूप धारण करणे हे अनुकरणापेक्षा वेगळे आहे.

मांडणीच्या सोयीसाठी मी अनुकरण आणि रूप धारण करणे या दोन्हीही संज्ञा वापरतो.

अनुकरण कशासाठी? निव्वळ नाट्य प्रयोग उभा करण्यासाठी नाही नाही तर संपर्क साधण्यासाठी-

विश्वाशी, देवाशी, माणसांशी आणि समुदायाशी.

अनुकरण एक – माणसाचे

अनुकरण दोन – देवाचे – इथे देव मनात वसलेला आणि पुजलेला.

अनुकरण तीन – हे फक्त कीर्तनकार करत नाही तर श्रोता ही करतो.

सादर केली जाणारी संहिता आणि प्रयोग यामध्ये कीर्तनकाराचे त्या संहिता विश्वाशी- त्यातल्या अध्यात्मिकतेशी- वैश्विकतेशी तसेच प्रेक्षकांद्वारे बाह्य जगाशी असणाऱ्या नात्याचे आपण अवलोकन करू शकतो. या अवलोकनातून बऱ्याच बाबींचा उलगडा होऊ शकतो. एक तर, कीर्तनाचा खेळ असतो तो प्रेक्षक आणि समाज भान /संस्कृती भान दर्शवत असते. कीर्तनकार फक्त कलाकार/ सादरकर्ता नसतो तर तो त्या समुदायाचा भाग असतो. चालता बोलता कीर्तनकार असतो. आणि प्रेक्षक फक्त प्रेक्षक नसतो तर तो त्या परंपरेचा भाग असतो.

दुसरे की प्रोसेनियम च्या अवकाशात कीर्तन आकारत नाही. किंवा- आधुनिक परिभाषेतील रंगमंचीय अवकाशात ती साकारत नाही. म्हणजे मग, कीर्तनाच्या (न) लिहिलेल्या संहितेमध्ये रंगसूचनांचा अंतर्भाव नसतो. रंगसूचना कुणी कुणाला देत नाही तर तो सादरकर्ता त्याचे परमेश्वर भवताल भक्ती आणि प्रेक्षक यांना समोर ठेऊन तो त्या घेत असतो. त्याचे घेणे परमेश्वराकडूनही असू शकते. मी तर हे कितीदा ऐकलेय- देवाने सांगितलेय वैगेरे… विठ्ठल विठ्ठल…

मी नाट्यनिर्मिती – dramaturgy च्या मुद्द्याकडे येतो आणि माझी मांडणी आवरती घेतो. कालच्या एका चर्चा सत्रामध्ये क्रांतिगीता महाबळ यांनी दोन महत्वाची निरीक्षणे मांडली. त्या स्वतः कीर्तनकार आहेत म्हणूनही मला ती निरीक्षणे विशेष महत्वाची वाटतात. अलीकडच्या कीर्तन निर्मितीबद्दल भाष्य करताना त्या म्हणाल्या की नवे कीर्तनकार दुसऱ्याच्या कीर्तनाचे रेकॉर्डिंग बघून आपले कीर्तन तयार करतात. बदलत्या मी ‘माध्यमी मौखिक’ परंपरेत कीर्तनाची जी dramaturgy नाट्यनिर्मिती प्रक्रिया बदलली आहे त्यावर त्या प्रकाश टाकतात. बिना अभ्यास नटाने कीर्तनकाराने- जो स्वतः लिहिणारा , नाटक बसवणारा असतो त्याचे या परंपरेचे आणि अवकाशाचे भान काय आहे? दुसरे म्हणजे, या माध्यम क्रांतीतून आणि सादरीकरणाच्या परंपरातून कीर्तनकाराचे स्वतःच्या शरीराकडे आणि आवाजाकडे पाहण्याचे त्याला मांडण्याचे भान कसे बदलले आहे याचे काही नीट documentation दिसत नाही . उदाहरणार्थ, चारुदत्त आफळे नाटक करतात आणि कीर्तन करतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन करतात अशा वेगवेगळ्या अवकाशात सहज वावरणाऱ्यांचा अभ्यास होणे महत्वाचे आहे. त्याचे institution लेव्हल वर काही करता येईल काय आपल्याला याचा विचार व्हायला हवा.

आणि तिसरा महत्वाचा मुद्दा; मी लहानपानपासून पाहत आलोय. कीर्तनातून धर्म आणि लिंग विषयक टोकाचे सुलभीकरण करून कीर्तनाचे अक्राळ-विक्राळ रूपही मांडले जाते. म्हणजे हिंदू धर्माचे महत्व सांगायचे तर इतर धर्म कॅन्सल करायचे. जातीपातीतील हेवेदावे तर वेगवेगळ्या तऱ्हेने कीर्तनकार आणतात. विशिष्ट जातीतील लोकांना मोठे केले जाते. एकत्रित- किंवा भारतीय संस्कृती आणि कुटुंबाचे महत्व सांगायचे तर स्त्रीचा अनादर करणारे उद्गार- बोलणे, किंवा सासू सुनेतील भांडण किंवा नाते अत्यंत विकृत शैलीत मांडायचे. असे करत पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्थेला बळ देणारे बोलत राहायचे. मी आमच्या गावाकडच्या स्त्री पुरुषांना या बद्दल विचारले की हे असालच चालतंय इथं. बरं, गावात तिथल्या भाषेत असेल तर शहरात तिथल्या भाषेत. मुद्दे तेच – धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण करणारे, पुरुषसत्ताक. कीर्तनाच्या माध्यमातून गाव आणि शहर दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होत असलेले आपल्याला दिसून येते.

Comentários


bottom of page