कुमार स्वरांचा शोध : वाचावा आणि पाहावा
- Ashutosh Potdar
- Nov 8, 2023
- 5 min read
मला कुमार गंधर्वांचे गाणे आवडते. आजूबाजूला माझ्यासारखे खूप जण आहेत ज्यांना कुमारजींचे गाणे आवडते. खरंतर, माझा-आमचा काळ म्हणजे भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जिंतेन्द्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे अशा थोर गायकांचा काळ. यातील काहींची ओळख आम्हाला झाली ती रेडिओवरील कार्यक्रमातून. लहानपणी रेडिओ आणि आजूबाजूला या गायकांची म्हटली जाणारी गाणी हेच माझ्यासारख्या कित्येकजणांना संगीताचे एक्सपोजझर होते. अर्थात, शहरात राहणाऱ्या काही जणांना टेलिव्हिजनही जवळचा असणार. पण, आता असे जाणवते की आम्ही सगळे जण - वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो तरी - कुमार गंधर्व ऐकत असू. मी रेडिओ वर आणि तर काही जण त्यांना मैफलीत समोर ऐकत असतील.
आता हे सगळं अधिक तीव्रतेने आठवतेय कारण माधुरी पुरंदरेंनी लिहिलेले आणि चंद्रमोहन कुलकर्णींच्या चित्रांचे ७२ पानांचे छोटे पुस्तक, कुमारस्वर : एक गंधर्व कथा . एकदा नाही दोनदा हे पुस्तक वाचून झाले. पहिले वाचन अगदी “ओह, मग काय झाले कुमारजींच्या आयुष्यात - गाण्यात?” - अशा उत्कटतेने. दुसरे वाचन, पुस्तकाची मांडणी, रचना वैगेरे समजून घेण्यासाठी.
भारतातील एका प्रतिभावंत कलाकाराचा प्रवास कुमार स्वर: एक गंधर्व कथा हे पुस्तक मांडते, सांगते आणि दाखवते.
माधुरी पुरंदरेंना आपण ओळखतो त्यांनी केलेले अनुवाद, मुलांसाठी लिहिलेली पुस्तके आणि त्यांच्या गायन आणि नाट्यक्षेत्रातील महत्वाच्या कामांमुळे. माझ्यासारखे बरेचजण त्यांची पुस्तके स्वतःसाठी वाचत असतीलच. त्याचबरोबर, आपल्या मुलाबाळांना वाचून दाखवण्यासाठीही त्यांची पुस्तके बऱ्याच वाचकांच्या घरी असतील. चंद्रमोहन कुलकर्णीची चित्रे, रेखाटने आणि शब्दांबरोबर ते ज्या सहजतेने रंग-रेषांतून खेळतात ते नेहमीच मला भावत आले आहे. रस्त्यावरून जाताना नीट, सुंदर रेखाटलेली पाटी पाहिली तर चंद्रमोहन कुलकर्णी डोळ्यासमोर येतात. पाट्यांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी कुलकर्णी देतात.
कुमारस्वर: एक गंधर्व कथा या पुस्तकाची रचना पुढील प्रमाणे आहे. सुरवातीच्या भागात त्याच्या लहानपणीच्या आयुष्याची ओळख, संगीतातले शिक्षण, मैफिलीतल्या गाण्याची सुरुवात ते ‘मला गाणं आलं’ इथपर्यंतचा प्रवास येतो. पुढील भागात, कुमारजींचे लग्न, आजारपण, देवासला स्थायिक होणे आणि लोकधुनांचा आधार घेऊन निर्माण झालेली गायकी आणि आजारपणानंतरचे गाणे. आणि शेवटच्या भागात, गायकीबरोबर केलेले विविध प्रयोग, लिहिलेल्या बंदिशी, मित्रपरिवार आणि कौटुंबिक घडामोडी, आणि महत्वाचे म्हणजे, समकालातील भारतातील गाणे आणि कलापरंपराचा प्रवास.
पुस्तकातून एका बाजूला कुमारजींच्या आयुष्याची गोष्ट तर दुसऱ्या बाजूला तो त्याच्या सांगीतिक प्रवासाची ओळखही वाचकाला होते. एक व्यक्ती असामान्य गायक होते म्हणजे नक्की काय होते याचा प्रत्यय आपल्याला या पुस्तकाच्या लेखनातून मिळतो. उत्तम गायक होताना कुमारजी चांगले ऐकणारे श्रोते होते. कुमारजींनी वयाच्या सातव्या वर्षी ‘अचानक’ गायला लागणे हा चमत्कार वैगेरे नव्हता तर त्यांनी “त्याआधी खूप लक्ष देऊन गाणं ऐकलं होतं, ते मनात साठवलं होतं.” हे सांगायला या पुस्तकाच्या लेखिका विसरत नाहीत.
लहानपणीच्या आयुष्यातील त्यांचे जीवन - खाणे पिणे खेळणे इथपासून संगीतातले विविध प्रयोग अशा सर्व गोष्टींचा पुस्तकात समावेश करताना उपदेश करणारे वा वाचकांना भारावून टाकणारे हे जुन्या वळणाचे लेखन नाही. कुमार गंधर्वांचा स्वभाव, हट्टीपणा आणि मित्र कसे झाले याबद्दलचे वर्णन कुमारजींच्या मित्रांच्या आठवणीचा उल्लेख करत करताना माधुरी पुरंदरे त्यांच्यावर असलेला सांगीतिक प्रभावही मांडतात. ‘शिवपुत्र’ चा ‘कुमार गंधर्व’ होण्याचा प्रसंग वर्णन केला आहे तो संगीत आणि भारतीय संप्रदाय परंपरा यामधील अन्योन संबंधांवर प्रकाश टाकणारा नमुना म्हणून संगीत तसेच संस्कृती अभ्यासक त्याकडे पाहू शकतील. संशोधकीय आणि लालित्यपूर्ण लेखन यांची सांगड घालणारे प्रभावी लेखन या पुस्तकातून वाचता येते.
कुमारजींचे नेहमीचे जीवन रेखाटताना त्यांच्या बहुआयामी गायकीतले मर्म, गायनाची वैशिष्ट्ये, त्यातील सौंदर्यभान आणि गायकीचा भवताल पुरंदरे मांडतात. उदाहरणार्थ, पुस्तकातील २२ व्या पृष्ठावर शास्त्रीय गायनातील घराणे म्हणजे काय याबद्दल सांगताना कुमार गंधर्वांचे देवधरांकडे शिकणे कसे वेगळे होते आणि कुमारजींनी स्वतःचा मार्ग कसा निर्माण केला याची मांडणी सहज येते. पुरंदरे लिहितात: “खरं तर कुमारजींनी परंपरेचा हात कधीच सोडला नव्हता. उलट स्वच्छ नजरेनं ते परंपरेकडे नव्यानं पाहत होते. एखाद्या संशोधकाप्रमाणे तिचा अभ्यास करून तिच्यातलं जे उपयोगाचं नव्हतं ते दूर सारत होते. त्यांना जे जे सुंदर आणि उपयोगाचं वाटलं त्यावरही रूढींमुळे बुरशी चढलेली होती. ते ती घासून-पुसून काढत होते आणि परंपरा पुन्हा लखलखीत करून रसिकांसमोर मांडत होते.” कुमारस्वर: एक गंधर्व कथा या पुस्तकातील मला विशेष जाणवलेली अजून एक बाब म्हणजे कुमारजींच्या गाण्याचा प्रवास त्या काळातील सतत बदलणाऱ्या समाज संस्कृतीच्या प्रकाशात आपल्या समोर येतो. विशेषकरून, बदलत्या भारतातला कलाकार आपली स्वतःची ओळख टिकवून ठेवताना दीर्घ अशा सांगीतिक परंपरांकडे कशा डोळस रीतीने पाहत होता आणि स्वतःची भाषा शोधू पाहत होता याचा शोध या पुस्तकातून घेतलेला आपल्याला दिसून येतो. गायकाचं जग निव्वळ त्याच्या गाण्यात किंवा रियाजात नसतं तर तो गायक कलाकार ज्या समाजाचा, मित्र- परिवार आणि वाद-चर्चांचा भाग असतो तिथूनही विकसित होऊन वाढत असतं. संगीत नाटक अकादमीची स्थापना, नामदेव ढसाळांची कविता, अल्बर्ट आईन्स्टाईन, भारत इतिहास संशोधन मंडळ, गिरीश कर्नाड अशा इतर नावांनी सूचित केलेल्या व्यापक आणि गुंतागुंतीच्या संदर्भ चौकटीत कुमार गंधर्वांच्या कार्याकडे पाहण्यासाठी हे पुस्तक आणि त्यातील रेखाटने आपल्याला प्रवृत्त करतात. त्याचबरोबर, शब्दबद्ध केलेल्या प्रवासाला ठळकपणे मांडण्यासाठी किंवा तो दिसताना सुंदर वाटावा म्हणून फक्त कुलकर्णींची चित्रे येत नाहीत. वेगवेगळे चित्र-प्रकार आणि शब्दखेळ करणा ऱ्या रेखाटनांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे. कुमारजींचे चित्र उभारणारे त्यांचे स्वतःचे चित्र-कथन विचारपूर्वक वापरलेल्या कागदातून आणि पुस्तकाच्या बांधणीतून येते. पुस्तकाची शिवण चित्रे खात नाहीत हेही नोंदवावे असे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
कुमारस्वर: एक गंधर्व कथा या पुस्तकात ठिकठिकाणी वेगवेगळी अवतरणे येतात ती कुणाची आहेत याच्या नोंदी नाहीत. शिवाय, पुस्तकाच्या शेवटी कुमारजींविषयीच्या पुस्तकांची यादी दिली असती तर ती वाचकांना उपयुक्त ठरली असती. त्याच बरोबर, क्यू आर कोड पुस्तकात आहेत मोजकेच आहेत. पण, कुमारजींचे
कुमारस्वर : एक गंधर्व कथा च्या मलपृष्ठावर दिल्याप्रमाणे हे पुस्तक कुमारांसाठी आहे. “यंदाचं वर्ष विशेष महत्वाचं आहे कारण कुमार गंधर्वांचं हे शंभरावं जन्मवर्ष आहे. ह्या निमित्तानं कुमारवयीन वाचकांना त्यांची गोष्ट शब्दांमधून सांगण्याचा आणि रंगरेषांमधून ती दाखवण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे.” पण खरंतर, कुमार गटातील वाचकांबरोबरच इतर गटातील वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे हे पुस्तक असताना कुमारवयीन वाचकांसाठी म्हणून या पुस्तकाची ओळख - जाहिरात प्रकाशकांना का करून द्यावी वाटली? हा प्रश्न मनात येत राहतो. कुमार गंधर्व या अत्यंत महत्वाच्या गायकाची ओळख करून देणारे मोनोग्राफ सारखे असे अजून दुसरे पुस्तक मराठीत प्रकाशित झाल्याचे माझ्या पाहण्यात नाही. ‘प्रौढ’ गटातील वाचकांसाठी कुमारजींची चरित्रे आहेत. जाहिरात आणि वितरणाच्या सोयीसाठी ‘कुमार गटासाठी’ म्हणून कुमारस्वर : एक गंधर्व कथा या पुस्तकाचे वर्गीकरण केले असेल तर तर त्याचा वाचक मर्यादित नाही का? असाही प्रश्न माझ्या मनात उभा राहतो. कारण, असा मोनोग्राफ कुणासाठीही वाचनीय ठरू शकतो आणि इथल्या सर्वांगीण पुस्तक संस्कृतीसाठी उपयुक्त ठरू शकतो. भाषा ‘सोपी’ आणि किंवा पुस्तकात एखाद्या ठिकाणी “तुला कदाचित माहीत नसेल —” असं येतं यावरून आपण हे पुस्तक “तुला” - वयाने लहान असणाऱ्या - कुमार गटासाठी उद्देशून आहे असे म्हणू शकतो. पण, सोप्या भाषेत मांडला गेलेला हा विषय सर्वांसाठी बहुमोल ठरणारा ऐवज असू शकतो.
कुमार गंधर्वांचा बहुसंख्य श्रोता प्रामुख्याने सुशिक्षित, संगीताची विशेष जाण असणारा, त्यांचा चाहता हा प्रामुख्याने शहरात राहणारा - संगीताबरोबर इतर कला आणि साहित्य प्रकारांची विशेष आवड असणारा, त्यातल्या त्यात, त्यांच्याबद्दलच्या भारावून टाकणाऱ्या गोष्टी सांगणारा - ऐकणारा. असे असूनही, कुमारजींच्या निधनाला तीस एक वर्षे होऊन गेल्यानंतर असे पुस्तक येण्यासाठी त्यांच्या शंभराव्या जन्मवर्षाची वाट पाहावी लागली हे विशेष. त्यांची काही चरित्रे, वेगवेगळी संपादने आणि वर्तमानपत्रांतील लेख प्रकाशित झाले असले तरी वेगवेगळ्या प्रकारच्या वाचकांना त्यांची नीट ओळख करून देणारे पुस्तक मला तरी दिसत नाही. या कारणासाठी, कुमार स्वर: एक गंधर्व कथा हे पुस्तक महत्वाचे आहे. गांव, शहरातील वेगवेगळ्या वयोगटातील वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचले पाहिजे.
कुमारजींच्या गायकीप्रमाणे कुमार स्वर: एक गंधर्व कथा या पुस्तकाच्या लिखाणात आणि त्यातील चित्रात स्वतःचा डौल, लय, सौष्ठव आणि सौंदर्य आहे. कुमारजींसारख्या गायकाला गाणं गाताना ते दिसत असे अशा गायकाचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारे हे पुस्तक छोटे-गोळीबंद असले तरी साचेबद्ध नाही. पुस्तकात कुमारजींचे कौतुक असले तरी गौरवीकरण नाही. कुमारजींचा शोध घेऊ इच्छिणाऱ्याचा प्रवास अधिक समृद्ध करणारे हे पुस्तक आहे.
कुमारस्वर: एक गंधर्व कथा
माधुरी पुरंदरे आणि चंद्रमोहन कुलकर्णी
ज्योत्स्ना प्रकाशन,२०२३.
Comments