top of page

कैद्याने केलेली ‘नाटके’

  • May 4, 2016
  • 4 min read

Updated: Oct 12, 2023


२०१५ च्या डिसेंबरातल्या शेवट्च्या आठवड्यात अमेरिकेतला हा कैदी मरण पावला. रिक क्लूशे हा कैदी मरण पावला. रिक क्लूशे हा सॅम्युएल बेकेट बरोबर काम केलेला नट मरण पावला.

रिक क्लूशे या कैद्याचा प्रवास या चार वाक्यांसारखा आहे. पण आयुष्य मात्र नाटयपुर्ण आणि अर्थवाही. १९३५ साली जन्मलेला रिक क्लूशे त्याच्या ऐन तारुण्यात धाडशी दरोडेखोर होता. १९५४ मधे लॉस एंजेलिस मधल्या एका हॉटेल वर सशस्त्र दरोडा घालणे, कार फ़ोडी करणे या अपराधाखाली त्याला जन्मठेपीची शिक्षा. कॅलिफ़ोर्नियातल्या सॅन क्वेन्टिन या तुरुंगात त्याची रवानगी होते. एकोणिसाव्या शतकात बांधला गेलेला हा तुरुंग एकापेक्षा एक रानटी आणि हल्लेखोर कैद्यांना ठेवायची जागा. इंग्रजी चित्रपट आणि कादंब-यातुन नेहमी चित्रित होणारा खलनायकी तुरुंग. १९५७ मधल्या एके दिवशी सॅन क्वेन्टिन मधे सॅम्यूएल बेकेटलिखित ‘वेटिंग फ़ॉर गोदो’ या नाटकाचा प्रयोग कैद्यांसाठी आयोजित केला जातो. प्रयोगाला सर्व कैद्यांना जायला मिळतं. पण, रिक क्लूशेला नाही. कारण, तो तुरुंगातल्या आधिका-यांसाठी डेंजरस कैदी होता. त्याच्या कोठडीतुन त्याला बाहेर काढले तर तो बवाल निर्माण करण्याचा धोका होता. कैदखान्यातच परत बंदीस्त करुन ठेवलेला क्लूशे आपल्या कोठडीतुनच ‘वेटिंग फ़ॉर गोदो’चा प्रयोग ऐकतो. नाटक बघुन आलेले त्याचे कैदी मित्र त्याला नाटकाबद्दल सांगतात. ‘वेटिंग फ़ॉर गोदो’ने कैदी भारावुन जातात. नाटकातल्या ‘आवाजा’ने क्लूशे भारावुन जातो. इथेच, कैदी असणा-या कलाकाराचा-नटाचा-दिग्दर्शकाचा जन्म होतो.

सॅन क्वेन्टिनमधल्या कैद्यांना नाटकाची आवड होती. पण, तुरुंगाच्या वॉर्डनकडून परवानगी मिळायला १९६१ साल उजाडले. सॅम्युएल बेकेटची तीन नाटके बसवली आणि ‘सॅन क्वेन्टिन ड्रामा वर्कशॉप’चा उदय झाला. आठवड्याच्या शनिवार रविवारी सॅन क्वेन्टिनमधल्या छोट्याशा खोलीत रिहर्सल्स होत असत. तीन वर्षात बेकेटच्या नाटकांची सात नवीन प्रॉडक्शन्स आकाराला आली.

सॅम्युएल बेकेट, गेल्या शतकातला महान नाटककार दिग्दर्शक, ताकदीचा कादंबरीकार. बेकेटच्या ‘वेटिंग फ़ॉर गोदो’ला लिहून साठ एक वर्षे होऊन गेली. पण अजुनही त्याचा प्रभाव टिकून आहे. त्या नाटकाचे जगभरात नित्यनियमाने प्रयोग होत असतात. त्याच्या नाटकांनी ‘थेटर ऑफ़ अबसर्ड’ ही संकल्पना आणि ‘अबसर्ड’ नाट्यव्यवहाराची मोठी परंपरा उभी केली. १९८९ मधे वयाच्या ८३ व्या वर्षी मृत्यु पावलेला हा थोर नाटककार फ़क्त रंगभूमीपुरता थांबला नाही त्याने ‘मोलॉय’, ‘मॉलॉन डाईज’ आणि ‘द अननेमेबल’ ही तीन महत्वाच्या कादंब-यांची मालिका लिहिली. बेकेटला १९६९ मधे नोबेल सन्मान मिळाला. माणसाच्या दुःखावर भाष्य करणारा त्यांचासारखा सच्चा कलाकार फ़क्त स्वतःच प्रगल्भ होत नाही. त्याच्याबरोबर त्याचे समृध्द घराणे आकाराला येते. ते घराणेही एकापेक्षा प्रगल्भ असा कलात्म अविष्कार निर्माण करते. बेकेटच्या घराण्यातला एक बिनीचा शिलेदार म्हणजे रिक क्लूशी.

बेकेटच्या नाटकांनी जगभरातल्या कलाकारांना धुंदवुन टाकले, बुचकळ्यात पाडले, विचार करायला लावले. माणसाच्या मनाचा तळ शोधत भवतालाचे चिंतन मांडणारे बेकेटचे नाटक काळ आणि अवकाशाच्या वेगळ्याच गुंत्यात वाचकांना आणि प्रेक्षकांना घेऊन जाते. पारंपरिक भाषिक आणि रंगमंचीय मांडणी मोडून नवे काही शोधु पाहाणा-यां बेकेटच्या नाटकांचे आकलन करणे कधी कधी जड होऊन जाते कारण त्यातल्या अनवट आणि वैचित्र्यपूर्ण शैलीमुळे. पण, क्लूशेसारख्या कलाकारांना बेकेट जवळचे वाटतात. जगभरातले कलाकार, प्रेक्षक बेकेटच्या नाटकाने गोंधळून जात असतात. त्याच्या नाटकांना काय प्रतिक्रिया द्यावी हे ब-याच जणांना समजत नाही. पण, क्लूशेसारख्या कैद्यांसाठी बेकेटची नाटके ‘नॉर्मल’ असतात. क्लूशे म्हणतात, “ बेकेट सगळ्यांना समजेलच असं नाही पण कैद्यांना समजतो.” बेकेटच्या ‘वेटिंग फ़ॉर गोदो’ मधील पात्रे कुणाची तरी वाट पहात असतात. आजन्म कारावासाची शिक्षा झालेले कलाकारही वाट पाहात राहात. कारण माहीत नसते. बेकेटच्या पात्रांप्रमाणे वेदनेने पिचलेली तुरुंगातली माणसे मुक्तीचे स्वप्न पहात असतात. क्लूशेसाठी बेकेटची नाटके बंदिस्त व्यवस्थेबद्दलची असतात. कैदी बंदिस्त व्यवस्थेत जगत असतात. बंदिवासातुन सुटण्याची खात्री नसते. सुटल्यानंतर काय करायचे याचा अंदाज नसतो. तुरुंगात असताना क्लूशे ‘वेटिंग फ़ॉर गोदो’ मधील व्लादिमीरचा रोल करत होते. ‘वेटिंग फ़ॉर गोदो’ या नाटकात व्लादिमीर आणि इस्ट्रॅगॉन ही दोन माणसे गोदो या नावाच्या कुणाची तरी वाट पहात आहेत. हा गोदो कोण आहे, तु कुठून येणार आहे, तो आल्यावर काय होणार याबद्दल नाटकभर सांगितलं जात नाही. नाटकाच्या अखेरपर्यंत गोदो येत नाही. पण गोदो हे नाटकातले एक महत्वाचे पात्र बनुन राहाते. दुस-या महायुध्दानंतरच्या भीषण परिस्थितीला तोंड देणा-या युरोपियन माणसाच्या वेदनादायी आयुष्यावर भाष्य करणारे हे ‘अबसर्ड’ नाटक वैराण माळरानावर निष्पर्ण झाडाच्या ओक्या-बोक्या पार्श्वभूमीवर घडते. युध्दखोरीच्या भीतीदायक वातावरणात माणसाच्या आस्तित्वाचाच प्रश्न उभा राहातो तेंव्हा परमेश्वर, मानवी नातेसंबध याबद्दलच मुलभूत प्रश्न बेकेट आपल्या कलाकृतीतुन उभे करतो.

स्वतःच्या आस्तित्वाबद्दलच साशंक असणा-या व्लादिमीरप्रमाणेच रिक क्लूशे घाबरलेले. ज्या तुरुंगात त्यांना ठेवले होते ते सॅन क्वेन्टिन म्हणजे यातनाघर जिथुन बाहेर पडणे हे एक दिव्यच. ओवाळून टाकलेल्या सॅन क्वेन्टिन तुरुंगातल्या मधल्या गुन्हेगारांमधे देव असण्याची काही शक्यता नसते असे सर्वसाधारणपणे वाटत असले तरी ते खरे नव्हे. कारण, किर्केगार्द हा तत्वज्ञ लिहितो त्याप्रमाणे देव रिझनिंगच्या पल्याड असेही बेकेट मानतो. त्या रिझनिंगच्या पलिकडच्या आस्तित्वाचा शोध घेणे हा बेकेटच्या नाटकाचे मर्म. त्या शोधाच्या प्रवासात बेकेट मानवी व्यवहारातील ताणे-बाणे, सत्ताकारण याची नाटकीय मांडणी करतो. साहजिकच, अशी नाटकिय मांडणी असुरक्षिततेत दिवस घालवणा-या क्लूशे सारख्या कलाकारांना जवळची वाटली यात काय ते आश्चर्य. बेकेटची नाटके खेळणे म्हणजे आपले आयुष्य मांडण्य़ाइतके कैद्यांना ते आपले वाटले. मग, ‘वेटिंग फ़ॉर गोदो’ असो वा ‘एंडगेम’. ही नाटके सॅन क्विन्टिनमधल्या कैद्यांसारखी तुटलेली, असुरक्षित, आणि आयुष्याबद्दलची खात्री नसलेली. क्लूशे म्हणतात की तुरुंगातल्या वॉर्डनने मला स्वातंत्र्य दिले नाही तर बेकेटच्या नाटकांनी स्वातंत्र्य दिलं. बेकेटच्या नाटकांनी दिलेले स्वातंत्र शरीराचं नसलं तरी मनाचं होतं. बेकेटची ‘क्रॅप्स लास्ट टेप’ ही एकपात्री एकांकिका रिक क्लूशींनी बसवली. एका पात्राची ही एकांकिका ६९ वर्षीय गृहस्थाच्या आयुष्याच्या भूतकाळ आणि वर्तमानाची गोष्ट आहे. ‘एंडगेम’ या बेकटच्या नाटकाचा कर्टन रेझर म्हणून क्रॅप्स लास्ट टेपचा प्रयोग १९५८ मधे पहिल्यांदा केला गेला. पण, नंतर स्वतंत्र नाटक म्हणून ते जगभरात सादर केले जाऊ लागले. या नाटकातल्या क्रॅप या पात्राप्रमाणेच सॅन क्विन्टिनमधल्या तुरुगांतले कैदी फ़्रस्ट्रेट होते. क्रॅपप्रमाणेच त्यांना भूतकाळातल्या वेदनांचे जू झुगारुन द्यायचे होते. नाटकाच्या सादरीकरणातुन ते शक्य झाले.

बेकेटची नाटके करणारे कलाकार जगातल्या डेंजरस तुरुंगात तयार झाले. त्यांची बेकेटशी ओळख नव्हती. होईल की नाही याची खात्री नव्हती कारण स्वतःच्या आयुष्याचीच खात्री नव्हती. पुढे सहा-सात वर्षानंतर क्लूशे परोलवर बाहेर आले. त्याकाळात, अनपेक्षितरित्या सॅम्युएल बेकेटशी क्लुशेंची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. निरिश्वरवाद मानणारा आणि मिथ्यावादाचा पुरस्कार करणारा बेकेट क्लूशेंसाठी ‘संत’ माणूस ठरला. पुढे जाऊन, तुरुंगातून सुटल्यावर बेकेट बरोबर क्लुशेंनी कामही केले. बेकेटनी त्यांना घेऊन आपली नाटके बसविली. रंगभूमीवर अविरत कार्य करणारा क्लूशेसारखा अभिनेता ‘क्रॅप्स लास्ट टेप’ सारख्या नाटकासाठी विशेष लक्षात राहिल.

रिक क्लूशेसारखे कलाकार आजच्या काळातले महत्वाचे दस्तैवज ठरतात. मी मराठीत नाटक लिहित असलो तरी किंवा भारतातल्या कलाकारांबरोबर संवाद साधत असलो तरी रिक क्लूशे माझ्यासाठी वा माझ्यासारख्या इतर अनेकांसाठी प्रेरणास्थान असतो. बेकेटच्या नाट्कांकडे ‘थेटर ऑफ़ अबसर्ड’ चे पालकत्व असले तरी त्याच्या बरोबरीच्या युजिन आयनेस्को, एडवर्ड अल्बी अशा नाटककारांच्या नाटकांनी त्याला ‘अबसर्ड’ ला विविध वळणा-वळणांनी समृध्द केले. फ़क्त एक नाटककार वा फ़क्त एक दिग्दर्शक अशा वेगळ्या घराण्यांची निर्मिती करु शकत नाही. त्या घराण्यांना रिक क्लूशे सारखे कलावंत आपल्या कर्तूत्वातुन उभे करतात. त्यांच्या, जीवनाचा आणि कार्य-कर्तुत्वाचा अभ्यास आज आपणा सर्वांसाठी महत्वाचा असतो.

गळ्यात गुन्हेगारीची पाटी अडकवलेली असूनही कलाकारीचा ठसा उमटवून मरणं भाग्याचं. असं भाग्य फ़ार जणांना लाभत नाही. स्वतःचा हिंसक इतिहास पुसून नव्या कर्तुत्वाचा वर्तमान स्वतःच्याच हाताने लिहिणारे फ़ार कमी. कारण त्यासाठी धमक लागते. ज्ञानाची ओढ मनात असावी लागते. त्या ओढीने आपल्या भूतकाळावरचे काळे डाग पुसून स्वतःच्या आयुष्याचे नव्याने कोरीव काम करणारे विरळेच. अशांपैकी रिक क्लूशे. ८२ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्याची क्लूशेंची जीवनयात्रा संपली असली तरी त्यांच्या नाटकांतुन आणि बेकेटवरच्या लेखनातुन ते नेहमी भेटत राहतील. जेंव्हा भेटतील तेंव्हा थेटरचा एक कोपरा उजळून निघेल, हे मात्र नक्की.

Comments


bottom of page