top of page

घंटा: १४० शब्दांच्या अल्याड-पल्याड

Updated: Oct 12, 2023

सत्य एकमेव नसते हे आताशा कुणाला विशेषकरून सांगण्याची गरज नाही. ते तसे असते. माणसाच्या जीवनात जे वैचारिक स्थित्यंतर आणि बदल झाले आहेत त्यातून आपल्या विश्वाकडे पाहण्याच्या संकल्पना बदलत राहतात. जग ही विस्तारणारी कल्पना असते आणि त्यात आपण जे काही पाहतो ते एकच एक आहे असे मानणे शक्य नाही. सत्यही प्रवाहित असते, एकजिनसी नसते. नाटक — इथे घंटा या नाटकाबद्दल बोलतोय — आपल्या अनुभूतीच्या कक्षा विस्तारात असते. जसजशा आपल्या कक्षा विस्तारतात तसतसे आपले ‘सत्य’ काय याचेही आकलन बदलत असते. सत्याची नवी व्याख्या ठरत जाते. नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार आपल्या निर्मितीद्वारे नियोजन करत, रचना आणि कोरिओग्राफ करत आपली कला मांडत असतो- नवे सत्य रचत असतो. 

जे काही तो मांडतो ते सत्य आहे हे आपण कसे ओळखतो? हा तसा अवघड प्रश्न आहे. सत्याचे आकलन होण्याचा मोठा पेच सर्वांसमोर असतो. त्यासाठी, आपण नाटकातील अनुभवाशी रिलेट करत असू,  त्या अनुभूतीबद्दल आपल्याला सहृदयता वाटत असेल वा थोडे व्हेगली मांडायचे तर नाटक आपल्याशी संवाद साधत असेल तर आपण म्हणू शकतो की नाटकातील सत्याचे आकलन होण्यास वाट मिळाली आहे. कलेतील सत्य ढोबळ मानाने वास्तव म्हणता येईल असे नसते, नसावे. ते हुबेहूब दिसण्यात नसते, ते फोटोग्राफिक नसते. वास्तव-दर्शनात  कुठे- कधी- कसे असे प्रश्न पडतील पण सत्याचे आकलन आपल्याला ‘का’ विचारण्यातून मिळते. नाटकात सत्यापर्यंत कसे पोहोचू शकतो? असा जर प्रश्न विचारला तर आपण निर्मिती- सृजनाद्वारे असे म्हणून शकतो. त्यातले सृजनशक्तीचे भान सत्याचा एक अविष्कार करत असते. 

घंटा हे नाटक असे सत्य – कलाकारांना आकळलेले सत्य- दोन माणसांबद्दलचे- त्यांच्या भवतालाचे – नाटकाच्या आणि मांडणीच्या सृजनभानातून मांडते. 

घंटा घंटा घंटा घंटा घंटा हे सॅम स्टायनर यांच्या लेमन्स लेमन्स लेमन्स लेमन्स लेमन्स या मूळ इंग्रजी नाटकाचे मराठी रूपांतर निरंजन पेडणेकर यांनी केले असून त्याचे दिग्दर्शन आणि आरेखन मोहित टाकळकर यांनी केलेय. ललित प्रभाकर आणि मल्लिका सिंग हंसपाल यांनी त्यात अभिनय केलाय. 

तर, घंटा या नाटकातून रूपांतरकाराला, दिग्दर्शकाला आणि नटांना जे सत्य रचायचे आहे ते नाट्यात्मकतेच्या विविध शक्यता एक्सप्लोर करत रचतात. त्यांना दिसलेल्या-जाणवलेल्या सत्याचे दर्शन घडवितात. आपल्याला ज्ञात असलेल्या सत्याचे वेगवेगळे पदर उलगडायला मदत करतात तसेच अज्ञाताच्या कंगोऱ्यात शिरतात. अशा तऱ्हेने, मला ज्ञात असणाऱ्या सत्याचा पुन्हा नाट्याविष्कार होतो आणि बरोबरीने काही एक आगळे आविष्करण ही दिसते.

घंटा पाहिल्यानंतर पहिली  प्रतिक्रिया त्यात काही एक सुटसुटीत तात्पर्य पाहणे, त्यामागचा हेतू तपासण्याचा प्रयत्न  करणे असे होऊ शकते. उदाहरणार्थ, नाटकात वर ढग कशासाठी आहे, दोन पात्रे किती अंगाशी अंगाशी करतात, नाटकातल्या प्रॉपर्टीज किती चकचकीत आहेत – किंवा काही नाही म्हणायला सुचलं तर – सगळं ‘हाय-फाय’ आहे असं म्हणून  त्यावर काहीतरी चिकटवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अगदी पुढे जाऊन यात ‘सामाजिक’ किंवा ‘पॉलिटिक्स’ काय आहे असे म्हणून सामाजिकतेबद्दलचा आग्रह धरला जाऊ शकतो. एखाद्या कलाकृतीबाबत असे ढोबळ मुद्दे आणि त्या अनुषंगाने होणारी चर्चा निरर्थक असते. पुढे जाऊन मी असे म्हणेन की एखाद्या कलानिर्मितीच्या प्रक्रियेवर तो अन्याय होऊ शकेल आणि कलाविकासाच्या प्रक्रियेत हे बाधा आणणारे ठरू शकते. यामागचे, एक कारण म्हणजे कला आणि समाज यामधले नाते बहुपदरी आणि गुंत्याचे असते आणि ते चुटकीसरशी एखादे वाक्य टाकून सांगता येणार नाही. 

घंटा नाटकाची चर्चा त्यातल्या ‘सत्या’च्या पार्श्वभूमीवर करतोय म्हणजे त्या नाटकातील कालनिरपेक्ष आणि कालातीत पणाबद्दल बोलतोय असे नाही. किंबहुना, कलाकृती आवडण्यासाठी कालनिरपेक्षता आणि कालातीतपणा हे गुण त्यात असायला हवेत असा काही माझा अट्टाहास नाही. घंटा नाटकात जे आणि जसे – नाट्यात्मकतेच्या विविध शक्यता अजमावत –  दाखवले गेले त्याची माझ्या मनावर आणि विचारावर जी प्रक्रिया झाली तिने मला नाट्यावकाशाबद्दल विचार करायला – नव्याने विचार करायला प्रवृत्त केले. मांडणीतील प्रामाणिकपणा आणि प्ले-फुलनेस , तो मांडण्याची पद्धत, त्यातली सौंदर्य दृष्टी, रचनेतील वैविध्य, न्युनतमाचे भान आणि भवतालला टिपणारे सर्जनशील अविष्कारण याचा प्रत्यय घंटा हे नाटक उत्कटतेने देते आणि त्यामुळे ते  मनात राहते.   

ड्रामटर्जी (Dramaturgy) या शब्दासाठी- संकल्पनेसाठी मला मराठी शब्द सुचत नाही आता. घंटा हे नाटक   ड्रामटर्जी बद्दल – त्यातनं आकारणाऱ्या प्रक्रियेबद्दल आहे. लिखित शब्दांना कलाकारांना रंगमंचीय अवकाशात अनुभवतात, तपासतात, खेळवतात आणि प्रकाश-सावल्या आणि ध्वनी अविष्काराबरोबर मांडतात. नाटककाराचे  कि दिग्दर्शकाचे नाटक या चर्चेपेक्षा (आणि ती चर्चा मी सोशल मीडिया साठी सोडून देतो) भाषा आणि अवकाश यामधले बहुस्तरीय नाते ड्रामटर्जीतुन अविष्कृत करताना काय प्रक्रिया घडत असावी याचे सूचन घंटा हे नाटक करते. इथे मी सूचन म्हणतो कारण आता माझ्या हाती मूळ नाटक नाही, निरंजनचे रूपांतर नाही आणि सादरीकरण-संहिता नाही. शिवाय, मी त्यांच्या रिहर्सल्स पाहिल्या नाहीत. दोनच कलाकार रंगमंचावरचा कोपरा-कोपरा आपल्या पायाखाली आणि अंगाखाली घेतात यात संकल्पना, सृजनशीलता आणि व्यवहार यांची सांगड आहे जी ड्रामटर्जीतुन सहज शक्य  होत असावी.  

नाटकातील नटांची सहजता अपिलिंग आहे. पण ते अपेक्षितही आहे. कारण, दोन्ही नट नाटक आणि सिनेमात बऱ्यापैकी रुळलेले आहेत. त्यांच्या प्रोफाइल वरून दिसते की ललित प्रभाकर कल्याणच्या रवींद्र लाखे यांच्या ‘मिती चार’ या संस्थेशी आणि मल्लिका हंसपाल अतुल कुमार यांच्या ‘ द कंपनी थिएटर’ शी निगडित. त्यामुळे ते नाटक सहज नसते तर मला आश्चर्य वाटले असते. कोणता घटक नटांना उत्तमतेकडे नेतो? तो घटक म्हणजे, त्यांच्या सहजतेची मांडणी. त्या नटांच्या सहजतेला – हालचालीं, क्रिया-प्रतिक्रिया, आवाज, ध्वनी आणि सायलेन्सन्सना ज्या तऱ्हेने आणि शैलीने डिझाईन केले आहे ते फक्त रूढार्थाने दिग्दर्शनात येणार नाही नाही तर त्यासाठी रचनाकारण लागणार. परंपरागत ब्लॉकिंग करण्याच्या तंत्रापलीकडे नटांच्या उर्जास्थानांना शोधून आशयाच्या अभिव्यक्तीसाठी रिहर्सल-प्रक्रियेतून नवी पद्धत शोधण्याचा प्रयोग दिसून येतो. मोहित अलीकडच्या त्याच्या नाटकांच्या क्रेडिट मध्ये दिग्दर्शन आणि सिनोग्राफी/डिझाईन/आरेखन वापरतो. ते रास्त आहे. मराठीत त्याची चर्चा करण्याची भाषा अजून तयार झालेली नाही. कारण, त्याबद्दल अवेअरनेस नाही

नटांच्या हालचालींबरोबर ध्वनी आणि संगीत मांडणीला पोषक ठरणारे होते. नाटकातल्या साधनांचा वापर आणि मांडणी हा देखणा, विचारपूर्वक आणि नटांच्या हालचालींना पोषक आहे. मानवी कौशल्याच्या आणि रचनेच्या वैविध्यपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण शक्यता मोहित नेहमी अजमावत असतो. घंटा नाटकात पोषक नव्हते ती ठिकठिकाणी बोलली गेलेली – संवादाची भाषा. काही ठिकाणी ती खूप मराठी होती तर काही ठिकाणी त्या भाषेला पैलू नव्हते. ती अजून ओघवती, बोली – ज्या सहजतेने नट वावरतात – त्या सहजतेने आली असती तर आवडले असते. अवकाशाचे जसे एक पोएटिक डिझाईन तयार होते तसे संवाद-भाषेचे होत नाही.

मी काही नाटकाचे रसग्रहण करत नाही. माझे इम्प्रेशन्स लिहितोय. त्यामुळे नाटकाची गोष्ट इथे मी देणार नाही. माझी ब्लॉग पोस्ट वाचणाऱ्यांना नाटकाची गोष्ट माहिती असणार आहे.

१४० शब्दांचे राजकारण, सत्तेची मग्रुरी आणि त्या मग्रुरीचा व्यक्ती आणि मानवी नात्यांवर पडणारा प्रभाव आणि त्याचबरोबरीने स्वतंत्रपणे – स्वतःच्या हिंमतीवर जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींमधले प्रेम, एकमेकांमधली असूया, अहंभाव , त्यांचा स्वतःचा काळ आणि सामाजिक संदर्भ अशा वेगवेगळ्या घटकांतून नाटक उभे राहते. ‘घंटा’त नाटक दिसते, समाज दिसतो, सत्ताकारण दिसते. अर्थात, असं काही ‘दाखवायचं’ आहे म्हणून असं दिसतं असं नाही.

नाटक बघून आल्यानंतर देवराया मला म्हणाला आता आपण अशा कुटुंबात राहतोय जिथे १४० शब्द सुद्धा जास्त आहेत. मला त्याची प्रतिक्रिया ऐकून गंमत वाटली. अर्थात, तो नंतर सत्तेने भाषेचे आणि समाजाचे दमन करण्याबद्दल आणि नाटकातल्या अवकाशाबद्दलही बोलला. पण, १४० शब्दांच्या अल्याड-पल्याड नाटक किती वेगवेगळ्या शक्यता देऊ शकते याचे मला अप्रूप वाटले. शिवाय, एकाच नाटकात सत्ताकारण, भाषा, नाते-संबंध आणि मांडणीतल्या सौंदर्याचे अधिष्ठान यातील अन्योन संबंधाबद्दल प्रोव्होकेशन्स आहेत हे मला महत्वाचे वाटते.

Comentarios


bottom of page