top of page

तीन कविता

  • Dec 30, 2022
  • 2 min read

Updated: Dec 2, 2023

गाऊ शकत नाही प्रेमाचं गाणं

प्रेमाचं गाणं गाऊ शकत नाही मी 
प्रयत्न केला तरी 
विरून जातो पार विसरून जातो प्रेमाचं गाणं येत नाही आता ओठांवर 

गाता येत नाही प्रेमाचं गाणं. 

नव-नवीन नावं येत राहातात मनात 
सुसाट धावत सुटतात येत राहतात आत 
शिरतात तोंडात पण 
मी गिळू शकत नाही नावांना 
आवाज नाही पकडता येत त्या गाण्यांचे 
पण गिळून टाकतो बिनदिक्कत टाकतो ती नावे. 
अडकून राहतात ती नरड्यात 
घुसमटून टाकतात ते शब्द आणि नावे 
किंचाळत राहातो नावांच्या नावाने 
वायफाय बंद ठेवतो मोबाईल स्विच ऑफ करतो 
पण तरीही नरड्यात अडकून राहतात 
ठसक्यासरशी बाहेर पडू पहातात पण 

प्रेमाचं गाणं गाऊ शकत नाही मी 

ठाऊक नाही कधी गाऊ शकेन का मी प्रेमाचं गाणं. 
नको तितकी नावे अडकलेली ओठांवर 
प्रत्येक नावांची एकेक भयकथा वर येत राहते 
प्रयत्न करतो - विसरायचा प्रयत्न करतो नावांना 

प्रेमाचं गाणं येऊ देत नाही ओठांवर 
ताणत राहतो शिरा खेचत राहतो स्वर 

गाऊ शकत नाही प्रेमाचं गाणं. 

***

आजकाल 

बरंच काही घडत राहतं 
या आयुष्यात 
पण, बरच काही घडत राहतं 
या देशात. 
घडण्यापासून दूर निसटत ठेवतो 
स्वतःला 
बजावत राहतो स्वतःला 
येऊ द्यायचा नाही तो वारा स्वतःपर्यंत 
पण आवरता येत नाही स्वतःला 
मान वळवताच 
उलगडत जातात शोकांच्या घड्या. 
जळणाऱ्या प्रेतांसमोर रडताना 
मागे रचली जाताना दिसतात अजून काही सरणे 
अनोळखी असतात ती पण चटका लावून गेलेली. 
अ  ब क ड 
ती तो ते त्या 
आता येणार नसतात ते परत 
नृत्यांचे पदविन्यास सादर करण्यासाठी 
किंवा निशब्द करण्यासाठी आपल्या शब्दांनी 
मिळवणार नाहीत ते वाहवा आता 
आपल्या ओघवत्या शब्दांतून 
किंवा पकडणार नाहीत ते आता सहाची बस 
आकाशवाणीच्या उगवण्याऱ्या स्वरांबरोबर. 

बरंच काही घडत राहतं 
या देशात 
ती तो ते त्या 
येणार नाहीत आता परत 
जाणून घ्यायचेय त्यांना मला 
ऐकायचेत त्यांचे हृद्य स्वर 
त्यांचे माझ्यातले आत्मे मरेपर्यंत. 

***

खाजवत राहतो सतत 

खाजवत राहतो सतत 
सतत सतत चुचकारतो 
उगाळत ठेवतो आपले 
इंद्रिय सुख. 
करत राहतो विधी 
सजवून धजवून ठेवतो 
मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला 
उद्दीपित करतो प्रत्येक नसेला 
गरम करत राहतो 
उकळत ठेवतो त्यांना त्या टीप बिंदूपर्यंत 

खाजवत राहतो सतत 

बसेपर्यंत चटके 
ठेवून राहतो हातावर हात 
आलटून पालटून परतून बघतो 
डावी बाजू कि उजवी बाजू 
खालून आणि वरून 
तपासत राहतो चढते रक्त 

खाजवत राहतो सतत 

सतत चुचकारत राहतो 
आपल्या दिशेला येणारे वारे 
मीठ टाकून चोळत राहतो आणि 
राक्षसी ऊर्जेत परावर्तित करू पाहतो आपण 

खाजवत राहतो सतत. 

Comments


bottom of page