प्रकाशाचं घुमणं
- Dec 2, 2012
- 4 min read
Updated: Oct 12, 2023
आस्ताद देबूंचा मुंबईतला इंटरप्रिटींग टागोर चा प्रयोग पाहुन झाल्यावर त्यांच्याकडे पहात होतो. प्रयोग पाहिल्यानंतर त्यांच्याशी आधीपासुन जोडलेले त्यांना भेटायला, त्यांचे हातात हात घेऊन बोलायला उत्सुक होते. घामाघुम झालेले आस्ताद प्रत्येकाच्या शुभेच्छांचा तेवढ्याच अदबीने स्विकार करत होते. प्रेक्षकांच्या गर्दीत एखाद्याला त्यांनी ओळखलं नसलं तरी तसं न दाखवता त्याच्याशीही त्यांचं नातं दिसत होते. येणारा प्रत्येकजण आस्तादना भेटायला येत होता तसा काही वेळापुर्वी त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीलाही भेटायला येत होता. या प्रयोगाचा शेवट आस्तादांनी त्यांच्या ठेवणीतल्या गिरकी-प्रकाराने केला. पहिल्यांदा संथ लयीत सुरु होणारी स्वतःभोवतीची गिरकी शेवटाला सुफ़ी संतांच्या चक्करची आठवण करुन देत एका विशिष्ट वेगात घुमत संपते. प्रेक्षकांचे दृष्य-जग त्या घुमण्यात एकवटून जाते. अचंब्याची भावना प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. स्वतःची लय न हरवता, बिन- अडथळ्याच, काही जणांनी मोजलं त्यानुसार जवळजवळ २५० गिरक्यांचं, हे घुमणं, एका तासापेक्षाही जास्त वेळ चाललेल्या या प्रयोगाच्या अखेरीस वयाच्या साठीतही आस्ताद कसं करु शकतात हे प्रेक्षकांना अचंबित करत राहातं.

प्रयोगानंतर त्यांच्या भवतीची गर्दी कमी झाल्यावर देबुंची भेट झाली. भेटल्यानंतर होणारा मनापासुनचा आनंद त्यांच्या चेह-यावर. प्रेमाने जवळ घेतल्यावर घामाने भिजलेल्या अंगात ताल जाणवत होता. घामात ओथंबुन तालीमी करताना काहीवर्षापुर्वी बेंगलोरात आस्तादना पहिल्यांदा बघितलं. त्यावेळी ते मणिपुरचे ढोलक कलाकार आणि संकिर्तन प्रयोग प्रकारातले गायक यांच्याबरोबर काम करत होते. इंफ़ाळमधे काही दिवस त्या कलाकारांबरोबर काम करुन ते तडक बंगलोरात येऊन दुस-या दिवशीच्या द रिदम डिव्हाईन प्रयोगासाठी उभे राहिले. अर्थात, मणिपुरी कलाकारांबरोबरचा हा प्रयोग त्यांच्या दीर्घ काळाच्या देवाण-घेवाणीचा भाग होता. आधुनिक नाच प्रकारांना पुढे घेऊन जाणारे आस्ताद भारत आणि भारताबाहेरच्या कलारुपांशी आपले नाते जोडतात, ते जोपासतात आणि नवं रुप जन्माला घालतात. जोडणं, बांधणं, जपणं आणि उभं करणं हे सूत्र समोर ठेऊन ते समकालिन नाचाची निर्मिती करतात. त्यांच्या वयातली पस्तीस-चाळीस वर्षे कमी केली तर किती होईल तेवढ्या वयाचे मणिपुरी कलाकार. पण त्यांच्याबरोबर रंगमंचावर संगळ्यांची वयं विरघळतात. एकमेकांच्या तालात आणि लयीत बांधलेल्या हालचाली निर्मितीतला आनंद साजरा करतात. सणसणीत प्रकृतीच्या, धोतर आणि मुंडासे घालतेल्या, गळ्यात ढोलक अडकवुन आणि तालात वाजवत लीलया नाचणा-या मणिपुरी कलाकारांबरोबर आस्तादनी ‘रंग शंकरा’ थिएटरमधल्या प्रेक्षकांना खिळवुन ठेवलं होतं. प्रयोगाच्या शेवटी-शेवटी सादर झालेल्या कृष्णलीलांमधे उभी केलेली आस्तादांचा समकालीन नाच आणि संकिर्तनातला ढोलक-नाच यामधली बंदिश नंतर बरेच दिवस मनात रेंगाळली होती.
इंटरप्रिटींग टागोर हा प्रयोग बघायला मी वैभव जोशीबरोबर टाटा थिएटर मधे पोहचलो. रविंद्रनाथ टागोरांची १५० वी जयंती साजरी होत असताना आस्तादांनी टागोरांच्या एकला चलो रे, युवर ग्रेस आणि सरेंडर या कवितांचे स्वतःचे चिंतन समकालिन नाचातुन मांडले आहे. ठाकुरदांच्या या कविता माणुस आणि परमेश्वर यांच्यातल्या समरसुन टाकणा-या आध्यात्मिक नात्यांच्या चिरंतनपणाला काव्यात्म रितीने अभिव्यक्त करतात. जे कुठल्याही कलाकृतीच्या मुळाशी मानले जाते असे ते कलेचे माणसाला उभं करण्याचे आत्मिक बळ देणारं रुप ठाकुरांच्या कवितेतुन आपल्याला दिसते. मी कोण आहे याचा शोध घेताना समर्पणाच्या बहुविध रुपांच्या शक्यता टागोर आपल्या शब्दरुपांतुन पेरतात. त्या शक्यतांचा पुनर्शोध आस्ताद देबु आपल्या नाच भाषेतुन घेतात.
आपण इथे जन्माला आलो, इथल्या समाजात राहातो, व्यक्ती-व्यक्तीमधले संबध जपतो, इथल्या संस्कृती आणि सभ्यतेचा पुरस्कार करतो. एवढे असताना प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतात. ते असे की, अखेरीला आपण कुणाचे?या विश्वव्यापाचा मालिक कोण? असं काही नाही की हे पहिल्यांदाच पडलेले प्रश्न आहेत. अनेकदा पडलेले असले तरी त्यातली जटीलता कमी होत नाही. त्यातली गुढता तेवढीच आवाहक राहिली आहे, शतकानुशतके. आपापल्या ’भाषे’मधे आपण आपण त्या जटिलतेतल्या गुढतेला सामोरे जातो, ती आकळुन घेण्याचा प्रयत्न करतो. छोटं मुल मांडलेल्या खेळातुन, चिखल-मातीतुन, कागदावरल्या रेघोट्यातुन आपल आकलन मांडत. आस्ताद सारखा कलाकार शरीर-हालचालींतुन, प्रकाश-खेळातुन, वस्तु-मांडणीतुन, संगीत-निर्मितीतुन मी, विश्व आणि ते यातले गुंगवुन टाकणारे जग इंटरप्रिटींग टागोर मधुन मांडतो .
१९९५ मधे आस्तादांनी टागोर मांडले होते पहिल्यांदा. पण, एकपात्री नाचातुन. आता, दिल्लीच्या सलाम बालक ट्रस्टची तरणीबांड मुले त्यांच्या पुनर्शोधात सहभागी आहेत. त्यांचे कमावलेले अंग आणि त्यांची लवचिक शरीरं सहजतेने देबुंच्या समर्पणात सामील होतात. नमुद करायलं हवं की, ही मुलं म्हणजे घरातुन पळुन आलेली, रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफ़ॉर्मवर सापडलेली. आयुष्याच्या एका टप्यावर, ठाकुरदांनी लिहिलय तसं, “तुमचं कुणीच नसेल ऐकत तर एकला चलो” म्हणत ती मुलं आपल्या पायावर उभी राहातात. आता ही मुले :आविनाश कुमार, पंकज गुप्ता, राजु थापा, रोहित कुमार, सलिम जहेदि, शमशुल विराज समृध्दपणे वाढतायत. त्याच्यातला कुणी सिनेमात काम करतो, कुणी कठपुतळीकार आहे तर बरेच जण आस्ताद बरोबर निष्टेने जगभरात प्रवास करतात. प्रत्येक प्रयोगानंतर आस्ताद त्या मुलांची ग्रेसफ़ुली ओळख करुन देतात.
आताचा प्रयोग बदललाय म्हणजे बहुपात्री झाला. त्याचबरोबर, नव्याने संगीत देणारा इटालियन संगीतकार फ़्रेडरिको सेनेसी त्यांना येऊन मिळाला. हरिप्रसाद चौरासिया आणि शिवकुमार शर्माना तबल्याची साथ देणारा सेनेसीने इंटरप्रिटींग टागोर मधल्या ‘वॉकिंग टॉल’ या तुकड्यासाठी संगीत दिले आहे. शिवाय, अमेलिया कोनी या इटालियन गायिकेने आणि धृपदियेने ‘सरेंडर’ या तुकड्यात सुंदर, गुंगवुन टाकणारा आपला आवाज, धृपद संगीताच्या शैलीत दिला आहे.
आकाश खुराना या मुंबईच्या रंगकर्मीने इंटरप्रिटिंग टागोर’ मधे प्रत्येक तुकडा सादर होण्याआधी टागोरांच्या निवडलेल्या कविता आपल्या प्रगल्भ आवाजात वाचल्या आहेत. एका तुकड्यात म्हणजे, `युवर ग्रेस’ या सुंदर कवितेच्या पहिल्या ओळीत ठाकुरदा म्हणतात, “आई, माझ्या दुःखाश्रुंनी गुंफ़ेन मी तुझ्यासाठी मोत्यांची माळ.” पुढे कवी म्हणतो, “ता-यांनी आणलेले प्रकाशाचे पैंजण आईच्या पायाशी वाहिलेले असले तरी, माझ्या माळेचे समर्पण आईच्या हृदयाशी असेल.” या सुंदर कवितेसाठी केलेली नृत्यरचना मला तितकी भावली नाही. पण, त्या तुकड्यामधे केलेला कठपुतळ्यांचा वापर मला महत्वाचा वाटतो. तो नुसता वस्तु-वापरापुरता राहात नाही. कठपुतळ्या, इतर (मानवी) पात्रांबरोबर, समिधा बनतात. दादी पदुमजी या नावाजलेल्या कठपुतळी कलाकाराने ‘जीवंत’ कठपुतळ्या साकार केल्या आहेत. तुकड्याच्या सुरुवातीला मयुरभंजी छाऊ कलाप्रकारातील मुखवटे घालुन चार कलाकार रंगमंचावर येतात, ‘आई’ भोवती फ़ेर धरतात आणि तिच्याकडे कृपेचे मागणे मागतात. क्षणभराच्या विश्रांतीनंतर प्रेक्षागृहातुन माणसाच्या आकारापेक्षा चार भव्य पुतळे रंगमंचावर येतात. लाल रंगाच्या कपडयातले, कालीमातेचे मुखवटे घातलेले आकर्षक पुतळे प्रकाशयोजनेच्या पार्श्वभुमीवर स्पेक्टॅकल उभे करतात. आताशा, कठपुतळया बनवण्याची आणि हाताळण्याची कला प्रगत होत चालली आहे. कलाकार ‘वस्तु’ वाटणा-या कठपुतळ्याना व्यक्त होण्यातले नवे नवे आयाम कला-तंत्रातुन देत आहेत. यातुन मानवी जटीलतेला सामोरे जाणे दादी पदुमजींच्या कलासादरीकरणातुन अभिव्यक्त होते. ‘य़ुवर ग्रेस’ या तुकड्यात भक्ताला कवेत घेणारे कालीचे पुतळे समोर संस्मरणीय प्रसंग उभे करतात.
यापुर्वी मी समकालिन नृत्यशैली आणि आस्ताद देबु यांचे काम याविषयी लिहिले आहे. आस्ताद गेली चाळीस वर्षे घुमतायत आपलं नाचणं घेऊन. नाचातले किती प्रकार त्यांनी केले. एवढच नाही तर, मणिरत्नम, विशाल भारद्वाज आणि एम एफ़ हुसेनच्या सिनेमासाठी नाच मांडणीही केली. रंगमंचावर त्यांचं नाचणं म्हणजे जसं प्रकाशाचं घुमणं. अर्थात, त्यात तोच तो पणाही आहे. सरप्राईज करत नाहीत ते, अलिकडे . पण, तरीही मला आस्तादना रंगमंचावर पहायला आवडतं. प्रयोग झाल्यावर त्यांची हाक ऐकायला आवडते. त्याच्यात उत्साह नाचत असतो तो निरखायला आवडतो. विजय तेंडुलकरांच्या एका पुस्तकाच्या नावात विचारलेय तसे, ‘हे सर्व कुठुन येते?’ असा प्रश्न पडतो आणि तो मला विचारायला आवडतो. उत्तर मिळवायचा प्रयत्न करु तसं कळतं: आमचा हा म्हातारा बराच चिवट आहे.
Commentaires