top of page

यक्षगान-शोधाचा प्रवास

  • Apr 28, 2016
  • 3 min read

Updated: Oct 12, 2023


कर्नाटकात उडुपीतल्या यक्षगान केंद्राला भेट देताना एखाद्या वाटेवरुन प्रवास करुन आल्यावर त्याच वाटेचा परत प्रवास करणं म्हणजे काय असतं याचा मी अनुभव घेत होतो. यक्षगान केंद्राची वाट माहितीची होती, मी जाऊन येऊन होतो. पण, यावेळी मी माझ्या विद्यार्थ्यांबरोबर नव्याने प्रवास अनुभवत होतो. गेलेला काळ मला परत पुकारत होता. त्या काळाचे अर्धे-मुर्धे बंद-उघडे दरवाजे मी परत उघडत होतो. भूतकाळ आणि वर्तमानकाळ फ़ुटाणे-साखर एकत्र बांधलेल्या चिकट पुरचूंडीसारखाच असतो.

यक्षगान केंद्रांवर जाण्याची माझी यावेळची भेट विशेष होती. पुलाखालुन बरेच पाणी वाहुन गेल्याचा मी साक्षीदार होतो. यक्षगान, लोककलांचा अभ्यास, शिवराम कारंतांचे निधन, शिक्षण. विद्यार्थी दशेच्या औपचारिकतेतुन बाहेर पडून वेगवेगळ्या नोक-या करुन मी शिक्षकी पेशात रुळलो होतो. स्वतःचे नाटके सादर होत होती. बंगलोरमधल्या माझ्या नोकरीच्या निमित्ताने भारतभरातले नाटक, ठिकठिकाणचे नाटकवाले यांच्याशी संबध वृध्दिंगत होत होते. आमच्या युनिवर्सिटीच्या डिस्कव्हर इंडिया प्रोग्रॅम मधे यक्षगान परंपरेवर संशोधन करणा-या मुलांचा मेंटर म्हणून आता उडुपीला आलो होतो. तिथली माणसे तीच. मीही तोच. पण आमच्या भूमिका वेगळ्या झाल्या होत्या. मी माझ्या मुलांचा शिक्षक म्हणून गुरु संजीव सुवर्णांना आमच्या मुलांना यक्षगान समजुन घ्यायला मदत करा म्हणुन साकडे घातले होते. ते मोठ्या मनाचे. मला तोडक्या-मोडक्या, कन्नडी हेल मधे, “तुम हो उनकों बतानें के लिये. मै काए कों” म्हणून गेले. सवयीप्रमाणे त्यांच्या पायावर मी हात ठेवला. गुरु संजीव सुवर्णा तशाच लुंगीत. तोच झब्बा. सायकल जाऊन स्कुटर आली. डोक्यावरचे केस पांढरे झाले होते. शिवराम कारंतांची आठवण करुन देईल असे त्यांचे केस मानेवर रुळले होते. यक्षगान केंद्राचेही रुप पालटुन गेलेले. शिकायला येणा-यांची संख्या वाढली. यक्षगानाकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टिकोन बराच बदलला. यक्षगानात काम करणारे प्रमुख नट बाहेर जाऊन रग्गड पैसा मिळवू लागले. सिनेमात कामे मिळावायला यक्षगान शिडी झाली आहे. एके काळी आयुष्यभर केंद्रात राहून साधना करणा-या मुलांपेक्षा बघे वाढले आणि वर्ष-सहा महिन्यांच्या ‘ट्रेनिंग’ वर यक्षगान संपुष्टात येऊ लागले आहे. अत्यंत गरीब कुटूंबात, काबाडकष्ट करत यक्षगान केंद्रात शिकून तिथेच शिकविणा-या गुरु संजीव सुवर्णांसारख्या इतर शिक्षकांच्या नजरेतुन हा बदल जाणवत होता. ते मला सांगत होते. नेहमीप्रमाणे त्यांचे कन्नड भाषेतील बोलणे हिंदी-इंग्रजीतून स्पष्ट करायला त्यांच्या पत्नी वेदवती होत्या. त्या कौतुकाने माझ्याशी बोलत होत्या, “तुम आये थे तब मेरा बेटा इतनासा था. पर तुम वैसे का वैसा हो. अब तुम बडा प्रोफ़ेसर और राय़टर बन गया है.” माझ्या बरोबरच्या विद्यार्थ्यांना बरच काही कळत होतं. बरंच काही डोक्यावरुन जात होतं. बरेच जण यक्षगानात वापरल्या जाणा-या जिरेटोपांच्या वेगवेगळ्या आकारांनी आणि वजनांनी तोंडात बोटे घालत होती. हातात घेतल्यावर एवढा जड टोप तर डोक्यावर घालून नाचताना काय होत असेल हे बघत होते. काही जण, यक्षगान कलाकारांच्या कपड्यांवरचा ‘एथनिक’ कलर बघून हुरळुन जात होते. कॅमेरा बाळगाणारी मुले कपड्यांचे रंग, कलाकारांचे भाव, मुद्रा टिपत होते. मधे मधे, कुणीतरी मोबाइलच्या वापरांमुळे मला इरिटेट करत होता. आधी बघावे, मनात साठवावे आणि मग फ़ोटो काढावा असा निर्णय आम्ही आधीच घेतला होता. तरी, काहीजणांचे हात सुलभ हातात येणा-या मोबाईलकडे आणि सेल्फ़ि-करणाकडे जात होता. पारंपरिक पद्धतीने यक्षगान कलाकाराला डोक्यावरचे कॉस्च्य़ूम्स तासनतास बसुन बांधावे लागतात. पण, आता यक्षगानातील आभुषणांसाठीच्या मटेरियलमधे बदल झाला आहे. हलक्या वजनाचे मटेरियल उपलब्ध आहे. अर्थात, ब-याच सिनियर कलाकारांना पारंपरिक मटेरियल शिवाय यक्षगान खेळता येत नाही ही ही एक गम्मत!

आर आर सीचे प्रमुख कृष्णभट्ट आम्ही येणार म्हणून आधीपासुन हरकले होते. काही न सांगता ते चक्क रेल्वे स्टेशनवरच रेल्वे पोहचायच्या वेळेला हजर. नेहमप्रमाणे खादीच्या कपड्यातला त्यांचा साधा वेश. पायात तशीच चप्पल. जगभर प्रवास करु कर्नाटकातील लोककलांचा विशेषतः यक्षगान परंपरेचा झेंडा दिमाखात मिरवणारे कृष्णभट आजोबा झाले असले तरी तसेच तरुण उमदे दिसत होते. एखादे संशोधन केंद्र चालवणे किती जिक्रीचे असते हे कृष्णभटांपेक्षा कोण अधिक चांगले समजू शकेल! संशोधन केंद्रासाठी कलाक्षेत्रात जाऊन साधन सामग्री मिळविणे, त्याची नीट वर्गवारी करुन ती काळजीपुर्वक जतन करुन ठेवणे. अत्यंत नाजुक अवस्थेत असणा-या ध्ननीमुद्रिका, चित्र फ़िती वा कागदपत्रे यांची काळजी घेण्यासाठी हवे असणा-या तंत्रज्ञानाचा खर्च तर आवाक्याबाहेरचा. शिवाय, संशोधन केंद्रात काम करणारे आधिकारी, तंत्रज्ञ असणे ही वेगळीच आणि महत्वाची गरज. भटांचा भर आहे की ते लोकांपर्यंत आणि संशोधकांपर्यंत केंद्र पोहचले पाहिजे. केंद्रातील उपलब्ध माहितीचा साठ जनसामान्यांपर्यंत पोहचला पाहिजे. हे समाजाकडून आले आहे ते समाजापर्यंत पोहचले पाहिजे.

पूर्वप्रसिध्दी: रसिक ॥ दिव्य मराठी ॥ २४ जानेवारी २०१६

Kommentarer


bottom of page