top of page

रंगनायक: अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ

  • Jan 8, 2023
  • 3 min read

Updated: Oct 12, 2023

रंगनायक: अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ

देखणं, संग्राह्य आणि वाचनीय असं हे पुस्तक – ‘रंगनायक’: अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ’ (संपादक- राजीव नाईक, विजय तापस आणि प्रदीप मुळ्ये, आविष्कार प्रकाशन, १९८८) माझ्याजवळ आहे याचा मला विशेष आनंद आहे. मागच्या आठवड्यात अरविंद देशपांडे स्मृती दिन झाला. अरविंद देशपांड्याना मी पाहण्याची शक्यता नव्हती – त्यांचा आणि माझा काळ वेगळा. तसेच, मी जिथे जन्मलो आणि वाढलो तिथे/तिथून त्यांची नाटके पाहणे शक्य नव्हते. मुंबई-पुण्याचे नाटक माझ्या आयुष्यात खूप उशिरा आले.

अरविंद देशपांडेंचे दर्शन मला ‘रंगनायक’: अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथाद्वारे अलीकडे झाले. (स्मृतिग्रंथात वापरलेली ‘रंगनायक’ लिहिण्याची पद्धत मी बऱ्याच वेळा ट्राय करून पाहिली पण काही जमलं नाही. म्हणून कॉम्पुटर जसं लिहायला देतो तसं लिहीत आहे.)

विशिष्ट अभ्यासासाठी म्हणून काही पुस्तके मी जमवत असतो. तो अभ्यास झाला की अशी पुस्तके बाजूला पडतात. मग ती नव्या पुस्तकांसाठी जागा व्हावी म्हणून कपाटात आत ठेऊन देतो. लागेल तेंव्हा बाहेर काढतो. नाटकाविषयीच्या अभ्यासासाठी अलीकडच्या काळात बरीच सामग्री जमवली – नेहमीप्रमाणे, कधी जुन्या पुस्तकांची दुकाने धुंडाळून तर कधी जास्तीचे पैसे मोजून तर कधी एखाद्याला विनंत्या करून. त्यात मला अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ ऑनलाईन विक्रेत्याकडून मिळाला, मिळविला. नाटकांशिवाय इतर क्षेत्रातील अभ्यासासाठीसुद्धा मला हा ग्रंथ महत्वाचा वाटतो. वेळोवेळी, संपादन प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदत करतो

तीन मुख्य भागांमध्ये विभागलेला आणि पाच वैशिष्ट्यपूर्ण परिशिष्टांचा अंतर्भाव असलेला ‘रंगनायक: अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ’ त्यातील ‘नांदी’च्या सलामीने विशेष ठरतो. पुढची २९३ पृष्ठे – पानोपानी – देशपांडेंबद्दलच्या आठवणी लेखनातून, चिंतनातून, विश्लेषणातून, छायाचित्रांतून, आराखड्यातून, नाट्यप्रयोगांच्या माहितीतून- हा ग्रंथ तसाच खास राहतो. श्रमातून आणि चिंतनप्रक्रियेतून साकारलेल्या या ग्रंथातील लेखन एकत्र गुंफण्यासाठी असलेल्या तीन विभागांसाठी तीन वेगवेगळी चित्रे विचारपूर्वक वापरली आहेत. पहिल्या विभागासाठी, हेनरी मुअर यांचे ‘फॅमिली’, लिओनार्दो विंची चे रेखाटन दुसऱ्या विभागासाठी तर तिसऱ्या विभागासाठी रोद्यान (कॉप्युटर की-बोर्ड विदुषकी) चे ‘थिंकर’. अर्थात, संपादक सांगायला विसरत नाहीत की “विभागांमध्ये केलेली लेखांची विभागणी ही हवाबंद आणि काटेकोर मात्र नाही.”

वर उल्लेखलेल्या तीन संपादकांनी नांदी लिहिलेली आहे असे असले तरी ती राजीव नाईक यांनी लिहिलेली असावी असे मला त्यातील भाषेमुळे वाटते. नाईकांचे लेखन मी गेले काही वर्षे वाचतोय – सद्याच्या हातातल्या प्रकल्पामुळे- नाईकांचे लेखन अधिक वाचतोय. त्यावरून केलेला हा अंदाज. तापस आणि मुळ्ये यांचे नाट्यक्षेत्रातले काम महत्वाचे आहेच. ग्रंथाची प्रस्तावना करत असताना संपादक स्मृतिग्रंथ मांडणीची व्यापक चौकटीत मांडत- वाङ्मय म्हणून स्मृतिग्रंथ निर्मितीचे महत्व विशद करत, आलेली वेगवेगळी आव्हाने समोर ठेवत, ग्रंथ कसा सिद्ध झाला याचे वर्णन करतात.

एखाद्या व्यक्तीमुळे भारावून न जाता, किंवा एखाद्या क्षेत्रात महत्वाचे कार्य केलेल्या व्यक्तीचे – ‘जीवन आणि कार्य’ मांडताना भविष्यात आपल्याला त्याचा काय फायदा होईल अशा कोणत्याही सामान्य मानसिकतेतुन वा महत्त्वाकांक्षेने हा स्मृतिग्रंथ आकारलेला नाही. तर, समाज, संस्कृती, कलाव्यवहार आणि व्यक्ती (विचार आणि कृती) याचा एक सजग आलेख मांडणारं हे पुस्तक आहे. पाहा संपादक काय लिहितात: “एखाद्या व्यक्तीचा केवळ गौरव वा नुसताच उदोउदो करणं , हा स्मृतिग्रंथाचा उद्देश नसतो, निदान नसावा. परंतु कित्येकदा दुःख ताज असल्यामुळे, गेलेल्याबद्दल वाईट बोलता नये म्हणून, किंवा लिहिणारे खाजगी आठवणींच्या पसाऱ्यात अडकल्याने; तटस्थ, वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध विश्लेषण अशक्य होऊन बसतं. उमाळे-उसासे – हुंदके-हंबरडे मग अशा तऱ्हेच्या स्मृतिग्रंथांमधून वारंवार भेटतात – कित्येकदा ते ढोंगी , तकलुपी, मोले घातलेलेही असतात. …. अर्थात ह्याला अपवाद असतातच. ह्यातला एखाददुसरा हुंदका प्रामाणिक खराखुरा आतून येणाराही असतो.”

सर्जनशील लेखक आणि अभ्यासक संपादन करत असेल तर त्यातील संशोधकीय चिंतन भाषेच्या तसेच रचेनच्या लहेजामुळे आणि विविधतेमुळे अधिक वाचनीय ठरू शकतो याचे उदाहरण म्हणून या स्मृतिग्रंथातील लेखनाकडे आणि एकूणच मांडणीकडे मी पुन्हा-पुन्हा जात राहतो.

ग्रंथ-संपादनक्षेत्रात जगभरातल्या साहित्य- विचार संस्कृतीत वेगवेगळे प्रयोग होत असतात. वेगवेगळ्या भाषा, अभिव्यक्ती आणि संस्कृती यांचा एक अर्थपूर्ण मिलाप एखादे संपादन घडवून आणत असते. विशेषतः, एका व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाला समोर ठेऊन गुंफलेले संपादन व्यक्ती आणि समाज-संस्कृती आणि अभिव्यक्ती च्या परंपरा यामधला सर्जनशील असा दुवा ठरू शकते. असेच एक संपादन, ‘रंगनायक’.

एखादा उत्तम स्मृतिग्रंथ कसा असावा याचे काही मापदंड ठरवायचे असतील तर तो ‘अरविंद देशपांडे स्मृति ग्रंथ’ अभ्यासून ठरवता येतील असे मला वाटते.

Comments


bottom of page