top of page

रंगसूचना

  • Aug 3, 2023
  • 2 min read

Updated: Oct 12, 2023

मागच्या वेळच्या अनुभवामुळे अमेरिकेचा लांब पल्ल्याचा हा प्रवास कसा कंटाळवाणा होऊ शकतो याचा मला अंदाज होता. यावेळेला थोड्या बऱ्या तयारीने प्रवासाला निघालोय. सहज काढून वाचता येईल असे एक पुस्तक, एक वही आणि पेन हातातल्या पिशवीत ठेवलेय. बरोबरीच्या i pad मधे वाचण्यासाठी स्कॅन केलेली एक दोन नाटके पण ठेवलीयेत. जेणे करून, मध्येच वेळ मिळाला किंवा वाचावसं – लिहावसं वाटलं तर मनाला चुळबुळ करायची संधी मिळणार नाही. आणि, विमानात समोर चालत असलेले सिनेमे बघत राहणार नाही. (एवढं ठरवूनही दोन सिनेमे बघून झालेच!) तर, प्रवासात ख्रिस्तोफर बाम यांचं The Theatrical Public Sphere हे पुस्तक- जे मी आधीच वाचायला लागलो होतो ते पुढे वाचायला लागलो. त्याबरोबर, एक मराठी नाटकही वाचले. आता त्या नाटकाचे नाव मी सांगणार नाही. फक्त त्यातल्या रंगसूचनेचा फोटो इथे देत आहे.

संहितेतील रंगसूचना हा घटक नाटक या साहित्य-प्रकाराचा अविभाज्य भाग असतो. किंबहुना, नाटक हा साहित्यप्रकार ओळखण्याचे ते एक ‘चिन्ह’ असते. नाटककार ज्या रंगसूचना लिहितो त्या कलाकारांसाठी आणि वाचकांसाठी असतात. नाटकाचा प्रयोग सुरू असताना मात्र रंगसूचना प्रेक्षकांसाठी नसतात. रंगसूचना नाट्य-प्रयोगात कशा सादर करायच्या हे त्या नाटकाच्या दिग्दर्शकावर अवलंबून असते. नाटकातील पात्र कधी येणार, कसे येणार किंवा ते कुणाशी बोलणार याच्या नोंदी रंगसूचनेत असतात. तसेच, रंगसूचना नाट्य-कृती, घटना- प्रसंगातील बदल दर्शवत असतात. नाटकातील पात्रांची समज आणि त्यांचे आकलन आपल्याला रंगसूचनेद्वारे कळते. इथे, नाटकातील भवताल समाज आणि संस्कृती निघतात.

साहित्य-प्रकारामध्ये रंगसूचनेला महत्त्वाचे स्थान असले तरी रंगसूचनेबद्दल वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. काही जणांसाठी रंगसूचना महत्त्वाच्या असतात तर काही जणांना अती झालेल्या रंगसूचना नाटक समजून घेण्याच्या प्रक्रियेत एक अडथळा ठरू शकतात. नाटकात किती रंगसूचना असाव्यात हा त्या नाटककाराच्या लेखन-विश्वाचा भाग असतो. पण, नाटकातील पात्रे, घटना, प्रसंग आणि दृश्ये लेखकाच्या ताकदीने विकास पावत नाहीत त्यामुळे रंगसूचनांची मदत घ्यावी लागते असा निष्कर्ष आपण अतीपणामुळे काढू शकतो. तसेच, अती झालेल्या रंगसूचनातून नाटककार वाचक, दिग्दर्शक आणि कलाकारांना आपण निर्माण केलेले नाट्य-विश्व इमॅजिन करण्याची संधी देत नाही असाही अर्थ आपण काढू शकतो. उत्तम रंगसूचनेतून नाटककार नाट्य-निर्मितीच्या वेगवेगळ्या शक्यता अजमावताना दिग्दर्शक- कलाकाराला त्यात स्वतःला दिसलेल्या जगाचे दृष्यरुप पाहण्यासाठी स्वतंत्र अवकाश देत असतो.

रंगसूचनांचे ‘वाचन’ करण्यासाठी आपण पुढील मुद्दे/प्रश्न उपस्थित करू शकतो:

  1. रंगसूचना आपल्याला कोणती माहिती पुरविते?

  2. नाटकातील संहिता-विश्वात रंगसूचना कोणत्या टप्प्यावर येते? त्या द्वारे कोणत्या आशय सुत्राची ओळख आपल्याला होते, ती कशी होते, कोणते आशय सूत्र पुढे सरकते वा त्याचा विस्तार होतो?

  3. रंगसूचनेद्वारे नाटककारच बोलल्याचा भास होतो की त्यातून वेगळा, तटस्थ आवाज ऐकू येतो?

  4. वाचक म्हणून रंगसूचना आपल्याला नीरस वाटते की नाटककार उभे करत असलेल्या विश्वाबद्दलची आपली उत्सुकता त्यामुळे वाढते?

  5. रंगसूचना व्यक्तिरेखा/पात्र-चित्रणात कोणती भर घालते?

  6. रंगसूचनेद्वारे संहिता-विश्वातील भवतालाचे आकलन होण्यास कशी मदत होते?

अमेरिकेतील ओहायो प्रांतात पोहोचेपर्यंत जे नाटक वाचले त्याने माझे लक्ष वेधून घेतले. या नाटककाराची सर्व नाटके वाचत आलोय. त्यांचा अभ्यासही करतोय. आतापुरते, त्यांच्या नाटकातील रंगसूचनेच्या निमित्ताने हे टिपण.

इथे दिलेली रंगसूचना असणारे नाटक कोणते आणि त्याचे नाटककार कोण आहेत हे तुमच्या लक्षात आले तर ते इथे जरूर सांगा.

Comentários


bottom of page