top of page

स्थलांतराची नोंद : १४ मार्च १९८८

Updated: Jan 14, 2024

साहित्य आणि संस्कृतीबद्दलचा इतिहास वेगवेगळ्या नोंदीतून आपल्यापर्यंत पोहोचत असतो. नोंद एखाद्या व्यक्तीच्या जन्माची असेल, छोटी-मोठी संस्था बंद पडण्याची असेल किंवा नव्याने सुरू झालेल्या नाटकाची असेल. व्यापक स्तरावर, एखादी नोंद देशाच्या अर्थमंत्र्यांनी लागू केलेल्या नव्या आर्थिक धोरणाची असू शकते किंवा एखाद्या सामाजिक घटनेची सुद्धा असू शकते. नोंदी आपल्याला नवं काहीतरी सांगून जात असतात, घडून गेलेल्या घटनांकडे पाहण्याची दृष्टी देतात. अभ्यासकांनी काढलेल्या निष्कर्षांना अधोरेखित करतात. काही नोंदी नव्या बाबींवर प्रकाशझोत टाकणाऱ्या असतात आणि सामाजिक इतिहासाकडे पाहण्याची वेगळी नजर देतात. चंद्रकांत कुलकर्णींची फेसबुकवरची अशी एक नोंद आपले लक्ष वेधून घेते. 



चंद्रकांत कुलकर्णींनी फेसबुकवर दिलेली – ‘१४ मार्च १९८८ ते १४ मार्च २०२३ ..!’ ही पोस्ट त्यांचा प्रवास दर्शवते. त्याचबरोबर, ती त्यांच्या औरंगाबाद वरून मुंबईला येण्याबद्दलची आहे. इथे, मराठी नाटकाच्या स्थित्यंतराच्या एका पैलूवर प्रकाश पडतो. तो पैलू म्हणजे, स्थलांतर आणि नाट्यकलेचा विकासाचा, त्यातील नात्याचा. प्रख्यात इतिहासकार सुमित गुहा हे अठराव्या-एकोणिसाव्या शतकाबद्दलचे आपले चिंतन मांडताना खेड्यातून – लहान गावांतून शहरांकडे झालेले स्थलांतर  महत्वाचे मानतात. वासाहतिक कालखंड जितका पाश्चात्य आणि देशी घुसळणीचा आहे तितकाच तो स्थलांतराचा  कालखंड आहे. वेगवेगळ्या कारणांप्रमाणे वासाहतिक कालखंडातील सरकारी शिक्षण आणि नोकरीची धोरणे स्थलांतराला कारणीभूत ठरली आहेत. नाटकापुरते बोलायचे तर आपण विष्णुदास भाव्यांच्या कारकिर्दीकडे आणि नाटकांकडे पाहू शकतो. त्यांच्यासारख्या वेगवेगळ्या कलाकारांचा प्रवास कोकणातून देशावर झाला. विष्णुदास  भाव्यांनी आपली नाटके सांगली पासून सुरुवात करत कोल्हापूर, पुणे मुंबई आणि मुंबईतील मराठी, गुजराती आणि पारशी मंडळींसमोर केली. घटना महत्वाची आहे. मराठी नाटकाला नवी दिशा देणारी आहे. हरिपूर आणि सांगली सारख्या गावात नाटक करणारा कलाकार आपले कौशल्य, ज्ञान आणि खटाटोप स्थानिक तसेच तिथल्या लोकांबरोबर शेअर करत राहिला. मग, भाऊ दाजी लाड वैगेरे मंडळींनी प्रयोग उभारणीसाठी लावलेल्या हातभारातून नाटक उभे राहिले. इथे, देवघेवीची प्रक्रिया मराठी नाटकाला आणि नाट्यभाषेला समृद्ध करणारी होती. अशी समृद्ध करणारी प्रक्रिया ऐंशीच्या दशकात सुरु झालेली दिसते.  चंद्रकांत कुलकर्णींची नोंद आणि त्यांचा – तसेच त्यांच्या जिगीषा या नाट्यसंस्थेचा प्रवास स्थलांतर आणि नाटक यांचे नातेसंबंध समजून घेण्यास मदत करतो.


सौजन्य- प्रशांत दळवी


संस्कृती आणि समाजाचे नवे आकलन करून घेण्याच्या प्रक्रियेत एखादे नाटक लिहिले जाणे आणि त्या नाटकाचा प्रयोग होणे महत्वाचे असते. कारण, संहिता कारण संहिता आणि प्रयोगाच्या मांडणीतून एक भाषा एक वेगळी भाषा वेगळ्या भाषेचा अविष्कार आपल्यासमोर येत असतो आणि ज्या वेळेला हे नाटक वेगवेगळ्या भूभागात जातो वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये समाजामध्ये जाऊन सादर केलं जातं त्यावेळेला त्याचे विविध ध्वनी ऐकू येऊ लागतात आणि त्यातून एका व्यामिश्र अशा समाजाचे दर्शन आपल्याला होत असते.  


नाटक लिहिणे, प्रयोग होणे जितके महत्त्वाचे तितकेच त्या स्थलांतरणाच्या प्रक्रियेची नोंद संस्कृतीसाठी महत्वाची.  १४ मार्च १९८८ या तारखेला  चंद्रकांत कुलकर्णी आणि त्यांच्याबरोबर नंतर प्रशांत दळवी आणि त्यांच्या त्यावेळच्या औरंगाबादच्या नाटकवाल्यानी गाव सोडून मुंबईला येणे ही घटना माझ्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. मुंबईसारखे शहर जेवढे मोकळे असते तेवढेच मोकळे गाव सोडून आलेले रंगकर्मी. म्हणजे, मुंबईसारखे सर्वांना आपलेसे करणारे, स्वीकारणारे शहर जेवढे महत्वाचे तेवढेच महत्वाचे असते त्या कलाकारांचे आपले गाव सोडणे.  त्यांच्याबरोबर- तिथल्या संस्कृतीचे- रंगभाषेचे – भाषेचे  संचित आणि ज्ञान ही येत असते, आणले जाते. या येण्यातून भारतीय कलाव्यवहार समृध्द होत गेलेला दिसतो. शहरात जाऊन नाटक करणारा तरुण वर्ग दिसतो पण त्याची पायाभरणी ‘स्मॉल टाऊन’ मध्ये झालेली आहे याची नोंद ठेवणे महत्वाचे आहे. गाव ते शहर असा एकरेषीय प्रवास असत नाही. नेहमी उत्क्रांतीच्या भिंगातून त्याकडे पाहता येणार नाही. महेश एलकुंचवार आशिष राजाध्यक्ष यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणतात: “..पण उरलेल्या भागात जर असं सूचित होत असेल की, लहान गावातली जीवनदृष्टी ही मर्यादित लहान आवाक्याची असते; तर ते मला मान्य नाही. वाचनातून जे आयुष्य वाट्याला आलं त्या जगण्यातून – मी खूप काही तीव्रतेतून जगलो आहे त्यातून – माझी जीवनदृष्टी बनलीय. पण अखेरतः माझी दृष्टी माझी आहे. माझ्यामुळं आपण कुठं वाढलो जगलो त्यांच्यामुळं, माझ्या वैयक्तिक इतिहासामुळं, माझ्या वारशामुळं ती बनली आहे. ती दृष्टी एका व्यक्तीची आहे. तिचं वर्णन ‘स्मॉल टाऊन’ असं करता येईल कि नाही मला माहिती नाही.” 


दळवी आणि कुलकर्णी/ सौजन्य- चंद्रकांत कुलकर्णी फेसबुक


चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी हे नॉस्टॅल्जिक नाहीत. चारचौघी च्या प्रवासाबद्दलची त्यांची नोंद यावर प्रकाश टाकते.  श्रीचिंतामणीच्या लता नार्वेकरांनी निर्मित केलेल्या या नाटकाने नव्वदीच्या दशकात प्रभाव टाकला. पुण्यातील बालगंधर्वमध्ये  १९९१ मधला पहिला प्रयोग झाला. दळवी लिहितात, “हळू हळू लक्षात आलं. म्हटलं तर त्या चौघी होत्या, म्हटलं तर चाळीस जणी; त्या अचानक भेटल्या असं तरी कसं म्हणायचं? त्याची बीज कॉलेजमध्ये असताना मी लिहिलेल्या स्त्री या एकांकिकेत होती. आमच्या बारा मैत्रिणींना घेऊन या समूह नाट्याचे शंभराच्या वर प्रयोग करताना आलेल्या अनुभुती होती. औरंगाबादला स्त्री आणि मुंबईला मुलगी झाली हो या दोन नाटिका एकाच वर्षी येणं हा ‘योगायोग’ वैगरे नव्हता, तर ही एकाच काळानं जन्माला घातलेली अपत्य होती.” एलकुंचवार आणि दळवी दोघेही आपापले संचित घेऊन बदलला सामोरे जाताना दिसतात. गाव आणि शहर, प्रायोगिक की व्यावसायिक या ध्रुवात्म मांडणीला नाकारत आणि अभिव्यक्तीच्या स्तरावर निगोशिएट न करता त्यांच्या निर्मिती झाली.दळवी लिहितात: “मात्र, त्यासाठी कोणत्याही ‘तडजोडी’, ‘अनुनय’ करण्याची किंवा वैचारिक रूळ बदलण्याची गरज नसते.गरज असते ती तुमचं वैचारिक आकलन भ्रष्ट न होऊ देता ‘अनुभवाचं अवकाश’ संक्रमित करण्याची त्यासाठी नाटकात केवळ समस्याप्रधानता असून भागत नाही. त्या समस्येचं नाट्यात्म विधान व्हावं लागतं.”(लोकरंग, ११ जानेवारी, २०१५.) 


लिहिण्यासारखं बरंच आहे. कित्येक जण काम धंद्याच्या निमित्ताने आपली गावे सोडून किंवा एका गावाला धरून वेगवेगळ्या गावात राहणारे स्थलांतरित, अर्ध-स्थलांतरित आहेत. यामुळे, नाटक-कविता-कथा  लिहीत असताना, त्याचा अभ्यास करताना चंद्रकांत कुलकर्णी आणि त्यांचा ग्रुप मला जवळचा वाटत आला आहे. त्यांच्याकडे अभिमानाने पाहिले जायचे. मी शिकत असताना, ते कोल्हापूरला येत असत, त्यांना ऐकायला मिळत असत. त्यांच्या एका मित्राचे सासरे माझे प्रोफेसर होते. त्या सरांच्या घरी या सगळ्या समूहाला एकत्र पाहिल्याचा आठवणी अजून-लख्ख समोर आहेत. कोल्हापूर किंवा औरंगाबादेतून मुंबईसारख्या मोठ्या शहरात जाताना कोणकोणत्या ठिकाणी, काय काय प्रकारचे निगोशिएशन्स करावे लागले असतील यांची मी कल्पना करू शकतो. यातून, कुलकर्णी-दळवी आणि इतर लोक नव-नवीन शिकत गेले असतीलच. त्याचबरोबर, त्या महानगरातल्या आडवाटेच्या – गर्दीतल्या – चिकटून चिकटून – स्वतःला सावरत उभ्या राहणाऱ्या नव्या-जुन्या माणसांना आणि त्यांच्या भवतालच्या सतर्क अवकाशांनाही काही नवं पाहायला आणि ऐकायला मिळालं असणार. 


वाडा चिरेबंदी नाटकाची तालीम/ छायाचित्र सौजन्य: चंद्रकांत कुलकर्णी यांची वेबसाईट


नाना प्रकारचे नाट्यप्रयोग करणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णीची नाटके पाहणे म्हणजे भारतातल्या व्यापक- बहुआयामी समाजाचा प्रवास पाहण्याचा अनुभव असतो. इंदिरा गांधी-राजीव गांधी-सॅम पित्रोदा-हर्षद मेहता-कॉम्प्युटर-मुंबईतली नाट्य चळवळ – प्रायोगिक/व्यवसायिक- नाटक/सिनेमा/अधेमधे- जागतिकीकरण असं सगळं मांडत असताना शेती/बिगर शेती-सहकार चळवळ-गावोगावच्या जमिनीचे तंटे- मध्यमवर्गीयातले ताण-तणाव, बहुभाषिकता असं जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणारे तसेच न-स्पर्श करणारे मॅट्रिक्स पाहायला मिळतं. मग, प्रश्न येतो- जे आले ते कोणत्या प्रकारचे नाटक आले? आपली गावे सोडून आलेली तसेच गावे धरून अवाढव्य शहरात आपले बस्तान बसवणाऱ्या लेखकांनी आपल्या भाषिक आणि कलाविषयक संचिताचे पुढे काय केले? गाव आणि शहर हे द्वंद्व आहे कि सरमिसळीची नवी रूपे आहेत?


Comentários


bottom of page